Sushma Andhare : नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. एकाला कुटुंब सांभाळायचं आहे, तर दुसऱ्याला मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या टीकेला आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आज लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“अमृता वहिनी या आमच्या लाडक्या भावजय आहेत. त्या कधी-कधी खरं बोलतात. खरं तर एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून पुढे आणायचं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली आणि अजित पवार यांच्यापेक्षा जास्तीचा लाभ स्वत:च्या पदरात पाडून घेतला, त्या सुनील तटकरेंना त्यांची मुलगी आदिती तटकरे यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस जे काही बोलल्या, ते एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यासंदर्भात आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

हेही वाचा – Amruta Fadnavis : “मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असे..”, अमृता फडणवीस यांची शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाल्या?

महायुती सरकारलाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी महायुतीलाही लक्ष्य केलं. “महायुती काहीही करायला गेली, की त्याचं उटलं होतं आहे. महायुतीच्या सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा गाजावाजा लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला, पण दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कोसळला. अशा एक ना अनेक घटना घडत आहेत. कारण त्यांची काम करण्याची नियत चांगली नाही. ते लोकाभीमूक काम करत नाही, तर मताभिमूक काम करतात. त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडमबाजी करतात, अशी लोक अडचणीत येणं स्वाभाविक आहे”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – Sanket Bawankule Nagpur Accident: ‘अपघातानंतर संकेत बावनकुळेला प्रत्यक्षदर्शींनी चोप दिला’, सुषमा अंधारेंनी केले अनेक धक्कादायक आरोप

अमृता फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

दरम्यान, नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. “माझं कुटुंब माझी जवाबदारी स्त्रिया म्हणू शकतात, पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी असं एक मोठे नेते म्हणतात तेव्हा अडचण आहे. पण देवेंद्र फडणवीस हे असं कधीच म्हणत नाहीत. त्यांनी संपूर्ण महिला, शेतकरी, मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी ते २४ तास काम करतात त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, तर “कोणी असा नेता निवडून येणार नाही ज्यांना आपले घर भरायचे आहे. ज्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे. असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवारांनाही लक्ष्य केलं होतं.