राज्यातील २१ हून अधिक समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्धार रविवारी ( १६ ऑक्टोबर ) व्यक्त केला. यावरून भाजपा आमदार, आशिष शेलार यांनी ‘शिवसेना आता गर्व से कहो हम एमआयएम हैं, सुद्धा म्हणेल’ अशी टीका केली होती. याला शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर सुषमा अंधारे म्हणाल्या, “आशिष कुरेशीजी, ओह्ह सॉरी.. आशिष शेलार… फडणवीसांनी तुमचं राजकीय क्षितिज मर्यादित केलं, तरी सुद्धा भाटगिरी करताना स्तर घसरत चाललाय. करोना काळात जे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं ना ते तुम्हाला सामान्य परिस्थितीतही करता येत नाही. ट्विट करायची खूमखुमी, असेल तर नांदेड संभाजीनगर वर बोला.”
हेही वाचा : “शांतपणे ग्रंथालयात जा आणि…”, एकनाथ शिंदेंना संजय राऊतांचा खोचक सल्ला; ‘मिलावटराम’ टीकेवर दिलं प्रत्युत्तर!
आशिष शेलार यांचं ट्वीट काय?
“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं… शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले!, राम मंदिरावर टीका करुन दाखवली!, हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली!, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले!, छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले!, वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांबरोबर सुपुत्राने जाऊन दाखवलं!,” असं टीकास्र आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागलं.
हेही वाचा : “मिंधे गटातील १३ पैकी १० खासदारांचं विसर्जन होणार, लोकसभेआधी…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
“गर्व से कहो हम हिंदू हैं” म्हणणारी शिवसेना आता.. ‘गर्व से कहों हम समाजवादी हैं’ म्हणू लागली..! भविष्यात कदाचित ‘गर्व से कहो हम एमआयएम हैं’ सुध्दा म्हणू लागतील!!,” असा टोलाही शेलारांनी लगावला.