Sushma Andhare on Aaditya Thackeray Statement: गेल्या ९ महिन्यांपासून राज्यात एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट याचीच चर्चा रंगली आहे. त्या घटनाक्रमाबाबत अनेक दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. यासंदर्भात ठाकरे गट आणि शिंदे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुंदोपसुंदी चालू असतानाच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यासंदर्भात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
‘इंडिया टुडे एन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात दोन्ही गटांकडून आधीच होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला आणखीन ऊत येण्याची शक्यता आहे. एकीकडे शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखोरी केल्याचा दावा केला जात असताना आता आदित्य ठाकरेंनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे त्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”
सुषमा अंधारे यांचं स्पष्टीकरण!
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल होत्या. त्या उघडल्या जाण्याची भीती होतीच. त्यामुळे त्यांना सतत तसं वाटत होतं. भाजपाची ती मोडस ऑपरेंडीच आहे की आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंग मशीनमधून धुवून काढू आणि दोषमुक्त करू. पण तुम्ही आमच्यासोबत आला नाहीत, तर मात्र तुम्ही जेलमध्ये जाल”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“एक तर भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा ही भाजपाच्या भूमिका कित्येक उदाहरणं देऊन स्पष्ट करता येईल. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेत काही वावगं आहे असं वाटत नाही”, असंही सुषमा अंधारेंनी नमूद केलं.