Sushma Andhare : संतोष देशमुख प्रकरणावरुन फोकस हलायला नको. संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि हत्येचा मास्टरमाईंड या सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली.
खंडणी आणि हत्येचा गुन्हा वेगळा असं होऊ शकत नाही
सुषमा अंधारे म्हणाल्या, “आधी खंडणी मागितली गेली आणि खंडणी न दिल्याने त्याची परिणीती खुनाच्या गुन्ह्यात झालेली आहे. त्यामुळे एका गुन्ह्यावर दुसरा गुन्हा आधारलेला आहे. खंडणीचा गुन्हा वेगळा आणि हत्येचा वेगळा असं होऊ शकत नाही. फॉरेन्सिक लॅबने ज्या गोष्टी तपासल्या होत्या त्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यात असलेले गुन्हेगार आणि हत्येतले गुन्हेगार यांच्या हातांचे ठसे जुळले आहेत. त्यामुळे एवढे पुरावे पुरेसे आहेत. ग्रामस्थांकडून अधीक्षक कौवत यांनी आठ ते दहा दिवसांची वेळ मागितली आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
राख आणि राखेशी संबंधित काय प्रकरणं आहेत? हे शोधलं पाहिजे-अंधारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवदेन दिलं होतं आणि आरोपींना मोक्का लावणार असं सांगितलं होतं. मोक्का हा संघटित गुन्हेगारीविरोधातला कायदा आहे. संघटीत स्वरुपात काही घडलं आहे का? गुन्ह्यांची मालिका आहे का? तर राख आणि राखेशी संबंधित गोष्टी २०० रुपययांनी चालणारा हैवा आता ८ हजारांवर गेला आहे. पवन चक्क्यांचा अँगलही समोर आला आहे. २८१ पवन चक्क्या बीडमध्ये आल्या आहेत. त्यापैकी १३१ पाटोडा तालुक्यात आहेत. या पवन चक्क्यांना पोलिसांचं संरक्षण मिळतं पण शेतकऱ्यांना मिळत नाही.”
हे पण वाचा- Suresh Dhas : सुरेश धस यांचा दावा, “वाल्मिक कराडचं नाव १०० टक्के ३०२ च्या…”
वाल्मिक कराड यांच्या शरण येण्याचा घटनाक्रम स्क्रिप्टेड-अंधारे
एका खुनाचा शोध लावला जाईल आणि गुन्हेगारी संपेल असं होणार नाही. सगळ्याच गोष्टींचा तपास झाला पाहिजे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. वाल्मिक कराड यांनी शरण येण्याचा घटनाक्रम स्क्रिप्टेड वाटला असाही आरोप अंधारे यांनी केला. आरोपी शरण येताना जर मीच आलो आहे हे सांगत असेल तर ही बाब पोलिसांचा नाकर्तेपणा दाखवणारी आहे, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे-अंधारे
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की धनंजय मुंडेंची हितचिंतक म्हणून मला हे वाटतं की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. एखाद्या प्रकरणावर इतके आरोप होणार असतील तर सुषमा अंधारेंनी राजीनामा दिला पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला असं वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सगळं प्रकरण जेव्हा मिटेल तेव्हा पुन्हा मंत्रिपदावर यावं, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. बसवराज तेली अधिकारी आहेत त्यांच्या पत्नीही अधिकारी आहेत. महत्त्वाच्या पदावर दोघंही अधिकारी आहेत. निलेश लंकेंच्या मतदारसंघात त्यांची फसवणूक झाली होती. आता त्यांनी ठाम पणे प्रकरण धसास लागायचं आहे असं वाटत असेल तर शहाजी उमप यांच्यासारखे अधिकारी असले पाहिजेत. एक खुनाचा गुन्हा घडला आणि त्यातले गुन्हेगार पकडले गेले म्हणजे सगळं संपलं तर तसं ते नाही असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला त्यावेळी धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.