महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी गंगा भागिरथी हा नवा शब्द सुचवला आहे. लोढा यांनी जो निर्णय घेतला ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. तसंच या निर्णयावर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये असंच सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे सुषमा अंधारेंनी?

विधवा महिलांना समाजात जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यासाठी लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी. बाकी आम्ही सगळ्याच महिला, आमच्या ज्या अशा महिला किंवा भगिनी आहेत, माता आहेत त्यांनी काय नावं लावायची ते बघून घेऊ. त्यासंदर्भातल लोढांनी फार लोड घेऊ नये. महिलांबाबत वारंवार भाजपा नेत्यांकडून चुकीचं विधानं केली जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलणार आहेत का? हे सगळं गांभीर्याने घेणार आहेत का असाही प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

महिला आणि बालविकास या खात्याला महिला मंत्री नाहीत त्यामुळे अशा गोष्टी होणार ना. विधवा महिलांना गंगा भागिरथी म्हणायचं मग विधुर पुरुषांना म्हसोबा माळ म्हणणार का? असा फाजीलपणा करणं मंगल प्रभात लोढांनी टाळलं पाहिजे असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंचाही सवाल

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील गंगा भगिरथी या शब्दावरून आक्षेप घेतला आहे. आपल्या संस्कृतीत कुणीही थेट विधवा म्हणतच नाहीत. गंगा भगीरथीच म्हणतात. पण शासनाचा नियम आला असेल तर मग पत्नी वारलेल्या पुरुषांना काय म्हणायचं.. असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलाय.
विधवा महिलांना अशा प्रकारे विशेषण लावल्यानंतर त्यांची ओळख जाहीर केली जाईल, असा आक्षेप राज्यातील महिला संघटनांनी घेतलाय. विविध ठिकाणच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त केलाय.

मंगल प्रभात लोढांनी काय स्पष्टीकरण दिलं?

गंगा भागीरथी असं संबोधण्यासंबंधीचा एक प्रस्ताव आला होता. तो मी राज्याच्या सचिवांना पुढे पाठवला आहे. मात्र त्याबाबत पूर्ण निर्णय झालेला नाही, असं स्पष्टीकरण मंगलप्रभात लोढा यांनी दिलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare said do not take load to mangal prabhat lodha over his ganga bhagirathi word decision for widow women scj
Show comments