विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणं हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून महिला आघाडीत नाराजीचं वातावरण होतं, त्यामुळेच गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता गोऱ्हे यांनी उत्तर दिलं आहे.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अंधारे म्हणाल्या, माझ्यावर कोणीच टीका करत नाही. दररोज सकाळी चार-पाच कॅबिनेट मंत्री बोलतात एवढंच, आता त्याचं काही वाटत नाही. मी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले, ते म्हणाले, संकटकाळात जे किल्ला लढवतात तेच दिसतात. सोयीस्कर भूमिका घेतात त्या लोकांबद्दल काय बोलायचं.
सुषमा अंधारे म्हणाल्या, नीलमताईंनी सांगितलं आहे की, त्या कोणावरही नाराज नाहीत. कारण नाराज होण्यासारखं काही कारण त्यांच्याकडे नाहीच. याचा दुसरा सरळ अर्थ असा की, समोर संधी दिसत असेल तर ती संधी घेतली पाहिजे. कारण संधी एकदाच दार ठोठावते. त्यांना संधी मिळाली आहे. खरंतर पक्षानेही (ठाकरे गट) अनेकवेळा त्यांना संधी दिली आहे. त्यांना चार वेळा विधान परिषदेवर आमदारकी दिली. त्यांना पक्षाने उपसभापतीपद दिलं, उपनेतेपद दिलं.
हे ही वाचा >> नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी पदं उपभोगल्यानंतर…”
सुषमा अंधारे म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांना पक्षाने सगळ्या संधी दिलेल्या असतानाही समोर मंत्रीपदाची संधी असल्याने त्यांनी ती घेतली. त्यांना तिकडे आरोग्य मंत्रीपदाची संधी मिळत असेल तर ही निश्चितच चांगली संधी आहे. मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. मंत्रीपदासाठी त्यांना माझ्याकडून आगाऊ शुभेच्छा.