लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यांचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील पक्षात अस्वस्थ असल्याचं वक्तव्य शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. सुषमा अंधारे यांनी रुपाली ठोंबरे यांना ठाकरे गटात येण्याचं आव्हान केल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, रुपाली ठोंबरे या लढाऊ कार्यकर्त्या आहेत. त्या नेहमी रोखठोकपणे त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असतात. विरोधकांशी बोलताना तार्किक मुद्दे मांडत असतात. परंतु, ज्या प्रमाणात त्यांना संधी मिळायला हवी ती संधी त्यांना मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्या खूप जास्त अस्वस्थ आहेत असं मला वाटतं. त्यामुळे एक मैत्रीण म्हणून मी त्यांना सांगितलं आहे की ही मुस्कटदाबी आता खूप झाली. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. कदाचित एक दोन दिवसांत त्या मला त्यांचा निर्णय सांगतील. रूपाली ठोंबरे यांनी माझा सल्ला ऐकावा, असं मला वाटतं. कारण, त्यांना पुढे राजकारणात कारकीर्द करायची असेल तर हा सल्ला त्यांनी ऐकायला हवा. ज्याचा पुढे त्यांना फायदाच होईल.

शिवसेनेच्या उपनेत्या म्हणाल्या, मला जितकी माहिती मिळाली आहे किंवा माझं त्यांच्याशी जे बोलणं झालंय त्यावरून मला असं वाटतं की त्या प्रचंड प्रमाणात अस्वस्थ आहेत. त्यांना असं वाटतंय की त्यांच्या पक्षात एकाच व्यक्तीला प्रवक्ते, स्टार प्रचारकपद, महिला शाखेचं प्रदेशाध्यक्षपद, महिला आयोगाचं पद दिलं जात आहे. सगळीकडे एकाच व्यक्तीला जर पदं मिळत असतील तर इतरांनी काय करायचं? पक्षासाठी काम करणाऱ्या इतर व्यक्तींचं काय? त्यामुळे मला असं वाटतं की रुपाली ठोंबरे बऱ्यापैकी अस्वस्थ आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्या योग्य निर्णय घेतील.

हे ही वाचा >> सुनेत्रा पवारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं मात्र आदिती तटकरेंकडून, काय घडलं नक्की…

रूपाली ठोंबरे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश होणार आहे का? तुमचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात काही बोलणं झालं आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी सुषमा अंधारे यांना विचारला. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. तशी ती आमच्या पक्षाची देखील आहे. त्यानुसार कुठल्याही व्यक्तीच्या पक्षप्रवेशावेळी त्या त्या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि नेत्यांशी बोलणं गरजेचं असतं. त्यानुसार माझं शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि संजय राऊत यांच्याशी प्राथमिक बोलणं झालं आहे.