शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला. तसेच पोलिसांनी गाडी अडवून आमच्या गाडीत शिवसेनेचे युवा नेते शरद कोळी आहेत का हे चेक केलं, असंही त्यांनी नमूद केलं. सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शरद कोळीही होते. गुरुवारी (३ नोव्हेंबर) चोपडा येथे सभेसाठी आले असताना सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या.
शरद कोळींनी केलेल्या भाषणावर गुलाबराव पाटील व त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच त्यांच्याविरोधात जिल्हा बंदीचे आदेश काढले, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.चोपडा येथील सभेला सुषमा अंधारे यांचं उशिराने आगमन झालंय यावेळी सभा सुरू होण्याआधी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सत्तेचा वापर करून कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे.
व्हिडीओ पाहा…
“माझी गाडी अडवण्यात आली”
सुषमा अंधारे म्हणाल्या, “माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की, शरद कोळी आमच्या गाडीत आहेत का? आम्ही त्यांना शांत आणि संयमी भाषेत उत्तर दिलं. कारण पोलीस कर्मचाऱ्यांविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. ते केवळ अंमलबजावणी प्रक्रियेचा भाग आहेत. पालकमंत्री किंवा शासनाकडून पोलिसांना जे आदेश मिळतात त्याचं पोलीस पालन करतात. त्यामुळे माझा पोलिसांवर राग असण्याचं कारण नाही.”
“शरद कोळींना जिल्ह्याच्या बाहेर सोडेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो”
“पोलिसांनी आमच्या गाड्या तपासल्या, शरद कोळी गाडीत आहेत का ते बघितलं, चौकशी केली. शरद कोळी यांच्याविरोधात जिल्हाबंदी कायद्याचे आदेश निघाले. त्यानंतर शरद कोळींना जिल्ह्याच्या बाहेर सोडेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. ते जिल्ह्याच्या बाहेर गेले. त्यापुढील जी न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया आम्ही आमच्या वकिलामार्फत पूर्ण करू,” असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
हेही वाचा : ‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी
“हवेत गोळीबार करणारे आणि हातपाय तोडण्याची भाषा करण्यांवर कारवाई नाही”
“एकीकडे हवेत गोळीबार करणाऱ्या सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर कारवाई केली जात नाही. मात्र, दुसरीकडे मागासवर्गीय शरद कोळी यांच्यावर जातीयवादी मानसिकतेतून कारवाई केली जात आहे. याचा आम्ही निषेध करतो,” असंही सुषमा अंधारेंनी नमूद केलं.