शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरकार उलथवून टाकण्यासाठीच अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलन केलं, असा गंभीर आरोप केला. “तेव्हा आंदोलन करणारे अण्णा हजारे आज एवढे प्रश्न आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर चकार शब्द बोलत नाहीत,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला. त्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शरद कोळीही होते. गुरुवारी (३ नोव्हेंबर) चोपडा येथे सभेसाठी आले असताना सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “हो, अण्णा हजारेंमुळेच भाजपा सत्तेत आली. त्याबाबत मी शास्त्रशुद्ध मांडणी केलीय. अण्णा हजारे लोकपालाची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही.”
“आज एवढे प्रश्न, पण अण्णा हजारे त्यावर चकार शब्द बोलत नाहीत”
“कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिघे विभक्त असले पाहिजे ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांच्या वर लोकपाल बसवला जातो तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो. माणसात निवडकपणा किती असतो, तेच अण्णा हजारे आज एवढे प्रश्न उभे राहत आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत,” असं सुषमा अंधारेंनी म्हटलं.
व्हिडीओ पाहा :
“लोकपाल आंदोलन केवळ इथलं एक सरकार उलथवून लावण्यासाठी”
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन केवळ इथलं एक सरकार उलथवून लावायचं, लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करायची आणि एक लाट तयार करायची यासाठीच होतं. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या गेल्या नाहीत.”
हेही वाचा : VIDEO: “तुमचे आशीर्वाद असू द्या”; एकनाथ शिंदेंच्या हात जोडून विनंतीवर अण्णा हजारे म्हणाले…
“लोकपाल आंदोलन एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं”
“संवैधानिक चौकटीत सत्ता विकेंद्रिकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लोकपाल आंदोलन सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं होतं. अर्थात चौकटीच्या बाहेरचं होतं,” असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला.