Sushma Andhare on Ashok Chavan Poster Against Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांचा निषेध व्यक्त होत आहे. शाहांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्या वक्तव्याप्रकरणी अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशभर ठिकठिकाणी निषेध मोर्चे आणि आंदोलनंही चालू आहेत. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने अद्याप शाहांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट भाजपा काँग्रेवर टीका करत आहे. भाजपा नेते काँग्रेसवर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा, त्यांना निवडणुकीत पराभूत केल्याचा आरोप करत आहे. भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी देखील यात उडी घेत काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेसच्या मुशीत वाढलेले, अनेक दशकं काँग्रेसमध्ये असणारे अशोक चव्हाण अलीकडेच भाजपात गेले आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण हे देखील काँग्रेस विरोधातील भाजपाच्या आंदोलनात आघाडीवर आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी भाजपाकडून प्रति आंदोलन चालू आहे. या आंदोलनात भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आघाडीवर आहेत. त्यांनी एक पोस्टर हातात घेत काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. “काँग्रेसने आंबेडकरांना दोन वेळा निवडणुकीत हरवलं, त्यांनी माफी मागावी”, अशी मागणी चव्हाणांनी पोस्टरद्वारे केली आहे.
हे ही वाचा >> संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
सुषमा अंधारेंची अशोक चव्हाणांवर टीका
अशोक चव्हाणांचा पोस्टर झळकावतानाचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना टोला लगावला आहे. या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात, खायचं कुडव्याच आणि गायचं उडव्याचं. एवढा मोठा साक्षात्कार आपल्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद उपभोगताना का बर झाला नाही? सध्या आपल्याला ६६ वे वर्ष चालू आहे. वय वर्ष ६५ होईपर्यंत आपल्या दोन पिढ्या याच काँग्रेसच्या लाभार्थी राहिल्या. तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही? काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्रीपद त्याचवेळी त्यांच्याच तोंडावर भिरकावून देत हा फलक तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपांनी हातात का घेतला नाही?”
हे ही वाचा >> संजय राऊत यांचं वक्तव्य, “महाविकास आघाडी आहे, स्वबळावर…”
तडीपार माणसाने बाबासाहेबांबाबत केलेल्या वक्तव्यावर तुमची भूमिका काय? अंधारेंचा चव्हाणांना प्रश्न
सुषमा अंधारे अशोक चव्हाणांना उद्देशून म्हणाल्या, ज्या काँग्रेसच्या नावाने फलक हातात घेतला आहे त्या काँग्रेसच्याच जीवावर शाळा, कॉलेज , डेअरी , डाळ मिल , ऑइल मिल, पेपर मिल , साखर कारखाने, मेडिकल कॉलेज, करोडोचे टेंडर्स , लाभाच्या जागा, पुढच्या पाच-पन्नास पिढ्यांना पुरेल एवढी जायदाद कमवल्यावर आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरच शहाणपण सुचतंय का? इथे मुद्दा काँग्रेसने काय केलं किंवा भाजपने काय केलं हा असूच शकत नाही. मुद्दा एका तडीपार माणसाकडून बाबासाहेबांच्या संदर्भाने झालेला उल्लेख यावर तुमची काय भूमिका आहे ते आधी सांगा.