महाराष्ट्र ड्रग्जमुक्त आणि नशामुक्त झाला पाहिजे. आज विजयादशमीचा दिवस आहे. त्यादिवशी एक संकल्प करु. महाराष्ट्राचा उडता पंजाब व्हायला नको म्हणून आम्ही सातत्याने एक भूमिका घेऊन उभे आहोत. १० ऑक्टोबरला ३०० कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला. मुंबईत ७१ कोटींचं कोकेन जप्त झालं. संभाजी नगरमध्ये २३ कोटींचं ड्रग्ज सापडलं. मुळा नदीच्या पात्रात ड्रग्ज सोडण्याचा प्रयत्न झाला. ज्या ज्या लेकीला, पत्नीला, आईला वाटतं की आपल्या घरात व्यसन नको ती प्रत्येक स्त्री माझ्याशी सहमत असेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात आक्रमक भाषण केलं. त्यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहा दिवसांपासून माझ्याशी मांडवलीची भाषा

आम्ही प्रश्न विचारले की मंत्री घाबरवतात. धमक्या देतात, अब्रू नुकसानीचा दावा करु सांगतात. मागच्या दहा दिवसांपासून माझ्याशी मांडवलीची भाषा करतात. माध्यमांच्या समोर एक बोलायचं पाठीमागून दुसरीच कृत्यं करायची हे काय चाललंय? व्हाया सुरत गुवाहाटी अब्रू कुठे ठेवली होती? असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला आहे.

मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशी अनेकांची अवस्था

मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरु? अशी म्हण आहे. या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांची अवस्था अशीच असेल. गृहमंत्र्यांना विचारलं की म्हणतात मुखवटे बाहेर येतील. मी याँव करीन आणि त्याँव करीन. गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यांखाली अडकवलंच ना? गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला मागचे नऊ महिने का लपवलं होतं? त्यासाठी इतका वेळ का लागला? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. ललित पाटील आमच्या पक्षाचा आहे हे सांगत आहात. मात्र आज तुम्हाला सांगते आहे बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. इथे पक्षाचा प्रश्न नाही. महाराष्ट्रातला तरुण व्यसनाधीन व्हायला नको ही आमची भूमिका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांना अनेकजण चाणक्य म्हणतात मला ते अजिबात पटत नाही

देवेंद्र फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसं घडवायची असतात. उदाहरणार्थ शरद पवार त्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवलं. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवलं? त्यांनी कुणालाच घडवलं नाही, त्यांनी फक्त जमवलं. तुमच्याकडे बोलायला लोकच नाहीत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक लोक तुम्ही संपवले आहेत असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. तुमचा पक्ष इतका मोठा आहे तर मग शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करत आहेत? हा माझा त्यांना सवाल आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare slams devendra fadnavis over drugs case and lalit patil case scj