विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी आज रीतसर (७ जुलै) एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडणं हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुषमा अंधारे यांच्यामुळे गोऱ्हे यांनी पक्ष सोडल्याचं बोललं जात आहे.
नीलम गोऱ्हे यांनी पक्ष प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेतील महिला आघाडीत नाराजी होती का? त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते आले की सगळे नाराजी विसरत असतात. सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्याची काही परिस्थिती नाही.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, त्यांनी वापलेला सटर-फटर हा शब्द माझ्या एकटीसाठी नव्हता. “अशा सटर-फटर लोकांमुळे…”, हे त्यांचं वाक्य अनेकांसाठी आहे. मी कोण आहे? मी ना आमदार, ना खासदार, ना नगरसेवक, ना जिल्हा परिषद सदस्य, मी कोणीच नाही. तुम्ही (नीलम गोऱ्हे) २५ वर्षांपासून या पक्षात काम करताय. मला येऊन केवळ १० महिनेच झाले आहेत. मी कोण आहे? मी पक्षासाठी लढणारी शिवसैनिक आहे. म्हणजेच त्यांच्या भाषेत सटर-फटर माणूस. पक्षासाठी लढणाऱ्या लोकांची प्रतिमा त्यांच्या नजरेत सटर फटर आहे.
हे ही वाचा >> “…तर ही चांगली संधी आहे”, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला; मंत्रीपदाचा उल्लेख करत म्हणाल्या…
सुषमा अंधारे म्हणाल्या, जो-जो शिवसेनेसाठी लढतो, छातीचा कोट करून उभा राहतो तो प्रत्येक माणूस नीलम गोऱ्हे यांच्या नजरेत सटर फटर आहे. त्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाचा अपमान करत आहेत, परंतु माझी काही त्यावर हरकत नाही. त्यांना माझ्याकडून मंत्रीपदाच्या शुभेच्छा.