Sushma Andhare on Prajakta Mali : परभणीतील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात गदारोळ झालेला असताना याप्रकरणी धनंजय मुंडे यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातंय. यानिमित्ताने धनंजय मुंडे यांची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली असून त्यांना विविध आरोपांखाली गुंतवले जात आहे. दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांची नावे घेऊन धनंजय मुंडे यांच्याशी जोडले आहे. थेट धनंजय मुंडे यांच्याशी संबंध जोडल्याने प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला आहे. तिच्या पत्रकार परिषदेनंतर तिच्या समर्थनार्थ अनेकजण उतरलेले असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. त्या एबीपी माझाच्या चर्चासत्रात बोलत होत्या.

प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद का घेतली?

सुषमा अंधारे म्हणाल्या, “फार शांतपणे आणि तटस्थपणे दोन-तीन मुद्दे मांडले पाहिजेत. मला असं वाटतं की पहिला मुद्दा सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेणं हे मला अप्रस्तुत वाटलं. त्यांनी पत्रकार परिषद का घ्यावी? मित्र तुमच्याकडून स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पृथ्वीचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असं म्हणून सोडून द्या. तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावं वाटलं?”

हेही वाचा >> Anjali Damania : “मी गणपतीची शपथ घेऊन सांगते, धनंजय मुंंडेंचं राजकारण संपवण्यासाठी…”, बीड प्रकरणात अंजली दमानियांचा दावा

पत्रकार परिषद पॉलिटिकल मोटिव्हेटेड

“तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंच होतं तर करुणा मुंडे यांनी खरं आक्षेपार्ह विधान केलं होतं. पण तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं. आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं पॉलिटिकल मोटिव्हेटेड वाटते. महिलांना तुम्ही काय समजता. इथल्या जातपितृसत्ताक व्यवस्थेत बाईचं कर्तृत्व शून्य केलं जातं. पण हे प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीच्यावेळीच सुचतं का? जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोललं गेलं तेव्हा का सुचलं नाही? सुरेश धस यांच्याविषयी जी आखपाखड चालली आहे, ते सुरेश धस कोणत्या पक्षाचे? तुम्हाला सुरेश धस यांच्याविरोधात आगपाखड करण्याची गरजच नाही. सुरेश धस भाजपाचे आहेत. भाजपाची संस्था आरएसएस आहे. आरएसएसच्या मुख्यालयात प्राजक्ता जातात, तेव्हाच त्या कलाकार राहत नाही. कारण तेव्हा त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टॅण्ड तयार होतो. त्यांचा राजकीय दृष्टीकोन तयार होतो”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“कालच्या मोर्चाला काऊंटर करण्यासाठी प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद झाली. मोर्चाच्या चर्चा बाजूला सारण्याकरता पत्रकार परिषद घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरण बाजूला करण्यासाठी जाणीवपूर्वक प्राजक्ता माळीचं प्रकरण पुढे आणायचं. हे का केलं जातं?”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.