काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचा निषेध म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष राज ठाकरेंनी शेगावात पोहोचण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कार्यकर्ते शेगावकडे निघाले होते, पण पोलिसांनी चिखलीतच त्यांना आडवलं. नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, मनसैनिकांचीही पोलिसांनी धरपकड केली.
राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ( १७ नोव्हेंबर ) संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शेगावच्या दिशेने रवाना झालं. मात्र, पोलिसांनी त्यांची बस चिखलीतच रोखली. तसेच, संदीप नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
“मनसे ड्रामा करणारा पक्ष आहे. हनुमान चालीसा आणि भोंग्याचे राजकारण अडीच वर्षात सुरु होतं. मात्र, आता कुठलेच राजकारण मनसेला करावे वाटत नाही. कारण, आंदोलन कधी, कोणासाठी आणि किती करायची हे ठरलेलं असते. पण, १४९ च्या नोटीसीला पळून जाणारे लोक, आज शेगावला जाण्यासाठी आंदोलन करत होते,” असे सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.