नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रासाठी अनोळखी नाही. खेड्यापासून ते शहरापर्यंत गौतमी पाटीलला सर्वजण ओळखतात. आता दिवाळी पहाटच्या निमित्तानं गौतमी पाटीलचा प्रथमच ठाण्यात लावणीचा कार्यक्रम झाला. माजी महापौर, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्या, मीनाक्षी शिंदे यांनी या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावरून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात येत आहे. आता शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “लावणी, पोवाडा, भक्तीगीतं, भावगीतं, गझल, भारूड, गोंधळ, अंगाई ही महाराष्ट्राची लोककला आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. एक उत्तम वाजंत्रीकार लग्नात आणि अंत्यसंस्कारावेळीही वाजवतो. मात्र, अंत्यसंस्काच्या ठिकाणी लग्नाचं, तर लग्नाच्या ठिकाणी अंत्यसंस्काराचं वाजवू नये, असा नियम आहे.”
“दिवाळी पहाटच्या निमित्ताने मंगल स्वर कानावर पडावे, अशी परंपरा आहे. दिवाळी पहाटला मंगल गाणी असतात. ठाण्यात वाजवली ती दंगल गाणी होती. अशी दंगल गाणी पहाटे वाजवणं हे तुमच्या संस्कृतीत बसतं का? ही संस्कृती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी शिकवली का? ही संस्कृती महाराष्ट्रालाही मान्य आहे का?” असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले.
“गर्दी नळावर भांडण झाल्यावर सुद्धा जमते. मुद्दा दर्दी आणि गुणवत्ता असलेल्या लोकांच्या आहे. आधी गुणवत्ता स्थिर राखायला शिका. बाकी शिंदे गटाकडे अद्यापही वैचारिक आणि नैतिक अधिष्ठा नाही. हे पहाटे झालेल्या दंगल गाण्यांमुळे अजून स्पष्ट झालं,” असा टोलाही सुषमा अंधारेंनी लगावला आहे.