भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा घडविण्यासाठी पहाटेचा शपथविधी गरजेचा होता, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

“तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन पहाटे झालेला शपथविधी हा भाजपचा आपद्धर्म होता. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा घडविण्यासाठी ते गरजेचे होते,” असे सांगतानाच “काही वेळा राजकीय परिस्थिती पाहून गरजेनुसार भाजपकडून् निर्णय घेतले जातात,” असे स्पष्ट मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “महाराष्ट्रातले मंत्री सरकारी कामात २० टक्के…” इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

“एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन चांगलाच धडा शिकला”

मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांना नागपुरात विचारण्यात आलं. त्यावर, “मुनगंटीवार यांनी धडा शिकवण्याचा भाषा केली. पण, एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन त्यांनी चांगलाच धडा शिकला आहे. म्हणून त्यांना आपण आगीतून उठून फुफूट्यात पडलो, असं वाटत असेल. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर अजून धास्ती घेतली आहे,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.

हेही वाचा : “पहाटेचा शपथविधी योग्यच होता, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

“बुंदसे गयी वो हौदसे नही आती है”

“एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने त्यांची नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे ‘बुंदसे गयी वो हौदसे नही आती है’… हे सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात येत नाही. म्हणून ते वक्तव्य करत आहेत,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare taunt sudhir mungatiwar on uddhav thackeray over ajit pawar fadnavis oath ssa