मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतल्यामुळे अमृता फडणवीस यांची चर्चा होते आहे. मात्र ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यासाठी त्यांनी संदर्भ शोधला आहे तो अमृता फडणवीस यांच्या जुन्या मुलाखतीचा. या जुन्या मुलाखतीत अमृता फडणवीस असं म्हणताना दिसत आहेत की सुषमा अंधारे या आधी मला माझ्यासारख्या वाटत होत्या. आता त्यांचं बोलणं स्क्रिप्टेड असतं. त्यावरूनच सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच अमृता फडणवीस यांचं मराठी ऐकून राज ठाकरेंना काय वाटलं असेल हे देखील लिहिलं आहे.
काय आहे सुषमा अंधारेंची फेसुबक पोस्ट ?
अमृतावहिनींना मी त्यांच्यासारखी वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं ? कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्या मध्ये ? मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का?
पण छे ! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असू शकत नाही. पण त्या ही पेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे , मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवाचा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुद्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोलली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकून कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत बुधवारी घेण्यात आली. ही मुलाखत अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे या दोघांनी घेतली. या मुलाखतीची चर्चा होते आहे. अशात सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्या उच्चारांवरून त्यांना टोला लगावला आहे. अमृता फडणवीस या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठी भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे. अशात राज ठाकरे यांनी त्यांचे काही शब्द करेक्ट केले होते. मुलाखतीत हे सगळ्यांनाच दिसलं. नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवून सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.