शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर तळागाळातील, चळवळीतील अनेक नेते ठाकरे गटात सामिल झाले. त्यापैकी एक म्हणजे सुषमा अंधारे. शिंदे गटासह सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आता सुषमा अंधारे यांनी उद्या रक्षाबंधनांच्या पार्श्वभूमीवर खास पोस्ट लिहिली आहे. वाट चुकलेल्या भावांना सन्मार्गाचा रस्ता सापडो याच सदिच्छा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, या पोस्टमध्ये त्यांनी शिंदे गटाचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरीही त्यांच्याचसाठी ही पोस्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा >> अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा मंत्रालयात टाहो, आंदोलकांनी सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
“उद्या राखी पौर्णिमा आणि कुठल्याही बहिणीला भाऊ राखी पौर्णिमेला सोबत असावा असं मनापासून वाटतं. महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करताना आम्ही विरोधक म्हणून भूमिका न मांडता भाऊ म्हणून भूमिका मांडत राहिलो. कारण यातल्या काहींनी निश्चितपणे अक्षम्य असा अपराध केला आहे. पण काहींच्या हातून नकळत चुका घडल्या आहेत आणि चुका दुरुस्त होऊ शकतात, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
तसंच, “आमच्या सगळ्याच भावंडांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वाट चुकलेल्या भावंना सन्मार्गाचा रस्ता सापडो हिच सदिच्छा”, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, महाप्रबोधन यात्रेसह इतर विविध कार्यक्रमात ठाकरे गटाची बाजू सुषमा अंधारे यांनी सतत मांडली आहे. तसंच, शिंदे गटावर प्रहार करून भाजपावरही तोफ डागली आहे. आजही त्यांनी कोणाचाही स्पष्ट उल्लेख न करता उपहासात्मक पोस्ट केली आहे.