“अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रुपाली ठोंबरे यांची मुस्कटदाबी होत असल्याने त्यांनी आता ठाकरे गटात यावं”, अशी ऑफर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली होती. या ऑफरवर रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, येणाऱ्या काळात पक्षातील सक्षम महिलांकडे नेतृत्त्व दिलं जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

चांगल्या सक्षम महिलांची नांदी सुरू झाली

“मी काम करणारी कार्यकर्ता आहे. योग्यवेळ यावी लागते. धरसोडपणा करून, मीच सर्वस्व आहे असं समजून योग्य ठरणार नाही. पण माझी वेळ अजित दादा नक्कीच आणतील”, असं रुपाली ठोंबरे विश्वासाने म्हणाल्या. एकच महिला जास्त लाभार्थी, इतर महिलांना संधी दिली जात नाही या आरोपांवर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “हे तुम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल. ज्या काम करणाऱ्या आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत. त्या तुम्हाला पदावर आलेल्या दिसतील.” तसंच, सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवल्याने पक्षाच्या आजच्या निर्णयापासून चांगल्या सक्षम महिलांची नांदी सुरू झाली असं म्हणता येईल, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> रुपाली ठोंबरे ठाकरे गटात प्रवेश करणार? फोनवरून चर्चेनंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, “त्या अस्वस्थ असून…”

महिला महिलांच्या स्पर्धेत सहकार्य करत नाहीत

सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात येण्याबाबत दिलेल्या ऑफरवरून रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “लोकांना वाटतं की माझ्यासारखी काम करणारी महिला त्यांच्याबरोबर असावी. हे माझं भाग्य आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. काम करणारी महिला त्यांच्याबरबर असावी हे त्यांनी खुलेपणाने आणि मोठेपणाने त्या व्यक्त झाल्या. यासाठी मी आभारी आहे. राजकारणात एकाच महिलेला पद दिलं जातं. दुसरीकडे महिला महिलांच्या स्पर्धेत सहकार्य करताना दिसत नाहीत. परंतु, महाराष्ट्रात विविध पक्षातील महिला जर पक्षात येण्यासाठी ऑफर करत असतील तर हा त्यांचा सन्मान आहे. हा माझा सन्मान आहे.

ऑफर स्वीकारली नाही

सुषमा अंधारेंनी दिलेली ऑफर स्वीकारली का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “सध्या मी ती ऑफर स्वीकारली नाही. कारण, मी अजित दादांबरोबर आहे. त्यांच्या नेतृत्त्वार पूर्ण विश्वास आहे. अजित दादा कधीही कार्यकर्त्याला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडत नाहीत, हा मला चांगलाच अनुभव आहे. मला राष्ट्रवादीत दोनच वर्षे झाली आहेत. त्यामुळे अजित दादांच्या नेतृत्त्वावर मी शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही. अजित दादा सक्षम महिलांना न्याय नक्कीच देतील.”

आता ऑफर स्वीकारली नाही, पण भविष्यात स्वीकारणार का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “भविष्य सांगणारी मी नाही. ज्यावेळी त्या घडामोडी होतील त्यावेळी सांगितलं जाईल.”, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

तुमची पक्षात घुसमट होतेय, मुस्कटदाबी होतेय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्यावर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “सुषमा ताई घुसमट कोणत्या अर्थाने म्हणत आहेत हे कळलं तर त्यावर चर्चा करता येईल. सक्षम महिलांना अजित पवार नक्कीच संधी देतील. त्याची सुरुवात सुनेत्रा पवारांच्या निमित्ताने झाली आहे.

राजकारणात सुषमा अंधारे या माझ्या मैत्रीण आहे, त्यांनी जे शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिली आहे. त्यांच्या ऑफरसाठी मी आभारी आहे. राहिला विषय माझ्या मुस्कटबादीचा.. त्या म्हणत आहेत की हीच योग्य वेळ आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. त्यांना काय वाटलं हे मी सांगू शकत नाही. मी अजितदादांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अजित दादांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आणि सुषमा ताईंची मी आभारी आहे, एका महिलेने दुसऱ्या महिलेला ऑफर दिली. याची मी आभारी आहे. परंतु, आपण संघर्षाच्या काळात नेत्याबरोबर असलं पाहिजे”, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटात येण्याच्या प्रवेशाचा चर्चांना पूर्णविराम दिला आहे.