शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि सर्वात विश्वासू म्हणजे मिलिंद नार्वेकर. राज्यातील सत्ता बदलानंतर नार्वेकर उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करतील, असेही सांगितलं जात होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे गटाकडून या चर्चांना पुर्णविराम लावण्यात आला होता.
पण, अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे सातत्याने अमित शाह यांच्यावर टीका करत आहे. त्यात नार्वेकर यांनी अमित शाह ट्विटरवरून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरून गिरीश महाजन यांनी नार्वेकर नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकलं असल्याचं म्हटलं.
हेही वाचा : “जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ
यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “दिवाळी असल्याने काही लवंगी मिर्चा तडतड करत आहेत. नार्वेकर शिंदे गटात जाणार हा फुसका बार भाजपाने सोडला आहे. तो बार काही केल्या वाजत नाही,” अशी खिल्ली अंधारेंनी उडवली आहे.
“तुम्ही कणकवली लिमीटेड कंपनीपर्यत मर्यादित…”
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका करत ‘मातोश्री’पुरत त्यांचं राजकारण असल्याचं म्हटलं आहेत. याचाही समाचार सुषमा अंधारेंनी घेतला आहे. “मातोश्रीत असलेल्या तीर्थरुप ठाकरेंनी कुवत नसताना तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. अन्यथा तुम्ही कणकवली लिमीटेड कंपनीपर्यत मर्यादित राहिले असता,” अशा शब्दांत अंधारेंनी राणेंवर टीका केली आहे.
“गिरीश महाजनांना दुसरं काहीच…”
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मिलिंद नार्वेकर प्रकरणावर भाष्य केलं आहे. “मिलिंद नार्वेकर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संस्कृतीत वाढले आहेत. त्यामुळे वाढदिवसाला अभिष्टचिंतन करणे गैर नाही आहे. गिरीश महाजनांना दुसरं काहीच काम नसल्याने ते नाराजीबाबत बोलतात,” असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.