अमरावती : उमेश कोल्हे यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवस आधी वादग्रस्त नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी प्रतिक्रिया व्हॉट्सअॅप समूहावर पाठवणाऱ्या शहरातील काही लोकांना धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. धमक्या दिल्याचा आरोप असलेल्यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
या संशयिताच्या विरोधात भादंवि ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण, हा गुन्हा अदखलपात्र असल्याने न्यायालयाच्या विशेष परवानगीने संशयिताची चौकशी करण्यात आली. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींशी त्याचा कुठलाही संबंध आढळून आलेला नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी धमक्या मिळालेल्या तीन व्यक्तींसोबत संपर्क साधला. पण, त्यापैकी दोन व्यक्तींनी खासगी कारणांमुळे पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. एका व्यक्तीने या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्याआधारे धमक्या देणाऱ्यांचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी त्यांच्या आवाजाचे नमुने गोळा केले आहेत.
होते. या आरोपींचा संबंध हा उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींशी आहे का, याची माहिती घेतली जात आहे.
धमक्या देणाऱ्या आरोपींनी संबंधितांना नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर पाठवल्याबद्दल सुरुवातीला जाब विचारला. त्यानंतर आपल्याकडे माफी मागतानाची चित्रफित पाठवण्याचे फर्मान सोडले. एका दुकानदाराला तर तू सध्या कुठे आहेस, आम्ही दुकानात भेटायला येतो, तुला बघून घेतो, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिसांना कारवाई करण्यासाठी लेखी बयाण आवश्यक असून ज्यांना अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्या, त्यांनी निर्भयपणे समोर येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.