बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय रस्त्यावर कंपनी बागेतील विहिरीत शुक्रवारी (४ फेब्रुवारी) संध्याकाळी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्या दोघींचा विहिरीत पडून मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणी बीड पोलीस तपास करत आहेत. निदा अल्ताफ शेख (१६), सानिया अल्ताफ शेख (१८) अशी मृत बहिणींची नावे आहेत.
निदा, सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाईतील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. मुळचे हैदराबादचे राहिवासी असलेले हे कुटुंब अंबाजोगाईत स्थायिक झाले होते. शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा, सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. संध्याकाळी एका युवकाला कंपनी बागेतील विहिरीबाहेर त्यांची पर्स पडलेली दिसून आली. त्या युवकाने विहिरीत डोकावून पहिले असता दोघींचे मृतदेह तरंगताना दिसून आले.
हेही वाचा : बीडमध्ये पेपरफुटी टळली; म्हाडाच्या परीक्षा केंद्रात डमी विद्यार्थ्याला अटक, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त
यानंतर या प्रकरणाची माहिती बीड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला. या दोन बहिणींची हत्या झालीय की त्यांनी आत्महत्या केलीय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस तपासातच या गोष्टींवरील पडदा हटणार आहे.