अहिल्यानगरः व्यायामशाळेतील तरुणांना नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्यास खंडाळ्याजवळ (ता. श्रीरामपूर) येथे इंजेक्शनसह पकडण्यात आले. त्याला श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले, मात्र हा आरोपी मध्यरात्री पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झाला. त्याचा शोध श्रीरामपूर शहर पोलीस घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात जावेद सिराज शेख (लोणी, राहाता) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, खंडाळा येथे जावेद सिराज शेख हा श्रीरामपूर -बाभळेश्वर रस्त्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर, नशेचे इंजेक्शन विक्री करत आहे. त्याच्याकडे परवाना नसताना तो औषधांची खरेदी तसेच देयकाशिवाय व्यायामशाळेमधील तरुणांना तसेच इतर ग्राहकांना विक्री करण्यासाठी त्याने आणल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी काल, सोमवारी रात्री सापळा लावून जावेद शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना नसलेल्या व शरीरास अपाय होऊ शकतो, अशा गुंगीकारक औषधांचे इंजेक्शन आढळून आले. पोलिसांनी यासाठी बनावट ग्राहक पाठवून शेख याच्याकडून सेवन करण्याकरता इंजेक्शनची मागणी केली होती. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी ३ हजार ३२ रुपये किमतीचे टर्मिन इंजेक्शन तसेच ७५८ रुपयांच्या दोन बाटल्या व ८० हजार रुपयांची मोटरसायकल ताब्यात घेतली.

त्याला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याच्याकडे इंजेक्शन कुठून आणतो, कोणाला विकतो, आदी माहिती पोलीस मिळवत होते. परंतु मध्यरात्री १.३० च्या सुमारास चौकशी सुरू असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन जावेद शेख पोलीस ठाण्यातून पळाला परंतू पळून जाताना त्याने पोलीस ठाण्याच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली. आता गुन्हा दाखल करुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.