देवळाली कॅम्पमधील हवाई दल आगार या संवेदनशील भागातील छायाचित्रे काढणाऱ्या शब्बीर हरूण शेख याचा जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख संशयित लष्करे तय्यबाचा हस्तक लालबाबा मोहंमद हुसेन उर्फ बिलाल याच्याशी काही संबंध आहे काय, याची छाननी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. काही वर्षांपूर्वी बिलालने याच पद्धतीने लष्करी आस्थापना, पोलीस प्रशिक्षण केंद्र व अन्य संवेदनशील ठिकाणांचे छायाचित्रण केले होते. शब्बीर शेख व बिलाल हे दोघे मूळचे सोलापूरचे असल्याने आणि त्यांची कार्यपद्धती समान असल्याने ही शक्यता तपास यंत्रणा पडताळून पहात आहे.
बिलाल आणि अबू जुंदाल यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, देवळाली कॅम्पमधील तोफखाना स्कूल व पोलीस आयुक्तालय या परिसराची टेहेळणी करत घातपात घडविण्याचा कट रचल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा लष्कर परिसराच्या छायाचित्रणाचा तसाच प्रकार पुढे आला आहे. हवाई दल केंद्रातील दहा छायाचित्रांसह परिसरातील २२ छायाचित्रे शेखने काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही बाब सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी शेख यास ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन केले.
न्यायालयाने १६ सप्टेंबपर्यंत त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. या परिसरात काही काळ त्याची बहीण वास्तव्यास होती. तिच्याकडे शेखचे जाणे-येणे असल्याने त्याला या परिसराची माहिती होती. प्रारंभी शेखने मुंबईतील कोपरखैरणे भागात आपले वास्तव्य असल्याचे सांगितले. तपासात तो मूळचा सोलापूरच्या सदर बाजार भागातील रहिवासी असल्याचे उघड झाले. जी छायाचित्रे त्याने टिपली, ती कुठे पाठविली काय, याची तपासणी यंत्रणा करत आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी बिलालला शिवाजीनगर भागातून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे ७०० ग्रॅम आरडीएक्स, ४ डिटोनेटर्स, ३ पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, अमेरिकन चलन, छायाचित्र आणि चित्रीकरण कॅमेरा, पेन ड्राईव्हसह आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली होती. नाशिक, पुणे व मुंबई शहरांत टेहेळणी करणाऱ्या बिलालने पाकिस्तानात जावून सांकेतिक भाषेत माहिती पाठविण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण घेतले होते. या दोन्ही प्रकारात संवेदनशील परिसराचे छायाचित्रण करण्याचा धागा असल्याने तपास यंत्रणा त्या दृष्टीने उभयतांमधील संबंध पडताळून पाहत असल्याचे सांगितले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा