भुजबळ व बेडसे कुटुंबिय यांचे व्यावसायिक संबंध असून त्यांच्या या संबंधांची विशेष तपासणी पथकातर्फे चौकशी करावी आणि ही चौकशी होईपर्यंत राज्यपालांनी भुजबळांना घरी पाठवावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर प्रकरणाची चौकशी गुंडाळण्यासाठी गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची धडपड सुरू असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
लाचखोर अभियंता चिखलीकरचे छगन भुजबळ यांचा विशेष कार्यकारी अधिकारी संदीप बेडसेशी संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी आधीच केला होता. त्यानंतर तडकाफडकी बेडसेची बदली करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अधिकारी नातेवाईकांच्या नावाने कंत्राटे घेत असल्याची तक्रारही सोमय्या यांनी केली. तेव्हा भुजबळ यांनी बेडसेसह शासकीय अधिकाऱ्यांची पाठराखण केली होती. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, सोमय्या यांनी शनिवारी नाशिकला येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चिखलीकर प्रकरणाविषयी चर्चा केली. या विभागाचे महासंचालक स्थानिक अधिकारी तपास करत असल्याचे सांगत असले तरी स्थानिक अधिकारी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशीचे आपणांस अधिकार नसल्याचे सांगत आहेत. लाचखोरीच्या प्रकरणात चिखलीकर वगळता कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी न करणे म्हणजे तपासाला पूर्णविराम देण्याचा प्रकार आहे. या प्रकरणात बेडसेचे नांव आल्यानंतर कारवाई न करता त्याची बदली करण्यात आली. मैत्री इन्फ्रास्ट्रक्चर, भावेश बिल्डर्स व परवेझ कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपन्यांच्या माध्यमातून भुजबळ व बेडसे कुटुंबियांचे आर्थिक संबंध आहेत. बेडसेची चौकशी झाल्यास आपले आर्थिक व्यवहार बाहेर येतील, अशी भीती भुजबळांना वाटत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
भुजबळांना घरी पाठवा : किरीट सोमय्या यांची मागणी
भुजबळ व बेडसे कुटुंबिय यांचे व्यावसायिक संबंध असून त्यांच्या या संबंधांची विशेष तपासणी पथकातर्फे चौकशी करावी आणि ही चौकशी होईपर्यंत राज्यपालांनी भुजबळांना घरी पाठवावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली.
First published on: 19-05-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspend chhagan bhujbal demand from kirit somaiya