उस्मानाबाद येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व दोन दिवसांपूर्वी १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या भिकाजी घुगे यांना महसूल विभागात परत पाठवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आज हा तडकाफडकी निर्णय घेतला.
उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या भिकाजी घुगे यांची अन्न व नागरी पुरवठा विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. नांदेडमध्ये भरती प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या भिकाजी घुगे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या अहवालानंतर राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केले होते. निलंबनानंतर त्यांना िहगोली येथे पदस्थापना मिळाली. तेथेही त्यांनी आपल्या कामकाजाची पद्धत बदलली नाही. िहगोली येथे त्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी झाल्या. २१ ऑगस्ट २०१४पासून उस्मानाबाद येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या भिकाजी घुगे यांना २२ डिसेंबर रोजी १२ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याकडील लाखो रुपयाची बेहिशोबी मालमत्ता उघड केली होती.
घुगे यांच्या या कारवाईनंतर आधीच मलिन असलेल्या पुरवठा विभागाची प्रतिमा आणखीनच मलिन झाली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घुगे यांना जिल्हा पुरवठा अधिकारी पदावरून तात्काळ कार्यमुक्त करत त्यांना महसूल विभागात परत पाठवले आहे. घुगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर जिल्ह्यातल्या काही अधिकाऱ्यांनी ‘हे घडणारच होते’ अशी प्रतिक्रिया खासगीत नोंदवली. एखाद्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई होणे अलीकडच्या काळातील पहिलीच घटना मानली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा