महापौरांबद्दल वर्तणुकीचे नेमके कोणते धोरण अवलंबावे यावरून त्यांच्यावर बहिष्कार घालणारे नगरसेवक-नगरसेविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महापौरांच्या वाहनावर झेंडय़ाच्या काठय़ा आपटून त्यांना सळो की पळो करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणीही करायची नगरसेवकांच्या या दुटप्पी वर्तनाची चर्चा सुरू आहे.
महापौर तृप्ती माळवी या लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या सर्व कार्यक्रम व सभांवर बहिष्कार घातला जात आहे. मात्र बहिष्काराच्या भूमिकेला मुरड घालण्याच्या मानसिकतेत काही नगरसेवक आले आहेत. त्यातूनच आगामी अंदाजपत्रक सभेला उपस्थित राहण्याची तयारी नगरसेवकांकडून सुरू झाली आहे. महापौर माळवी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांचे कार्यक्रम व सभांवर बहिष्कारांचा निर्णय झाला असला, तरीही अंदाजपत्रक महत्त्वाचे असल्याने या सभेसाठी काही व्यूहरचना आखून उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे आता स्थायी समिती सभापती, राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास सांगत आहेत. महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वच सभांवर बहिष्कार, असे आमचे धोरण नाही. अंदाजपत्रकाची सभा महत्त्वाची असल्याने या सभेस उपस्थित राहण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलून दाखवतानाच फरास यांनी या सभेस उपस्थित राहण्याचा निर्णय म्हणजे महापौरांच्या राजीनाम्याच्या मागणीपासून बाजूला जाणे असे नसल्याची मल्लिनाथीही केली आहे.  
महापौर माळवी या जनता दरबारचा कार्यक्रम संपवून घरी परत जात असताना नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांच्या धिक्काराच्या शिव्या देत वाहनावर झेंडय़ाच्या काठय़ा आपटून आक्रमक रीत्या निषेध नोंदविला होता याबद्दल नगरसेवकांविरोधात महापौरांनी तक्रार केली आहे. या घटनेत ३६ सदस्य संशयित आरोपी आहेत. पण या आरोपींना आपण केलेल्या हल्ल्याचे काहीच वाटत नाही. उलट उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समितीचे सभापती आदिल फरास, गटनेते राजेश लाटकर, गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे यांनीच महापौर माळवी यांच्या निवासस्थानावर झालेल्या दगडफेकीची चौकशी करून आरोपींना अटक व महापौरांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महापौरांनी राजीनामा द्यावा, यासाठी आमचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे आणि ते राहीलच, असे सांगण्यास नगरसेवकांनी कमी केले नाही. शर्मा यांना सांगितले. दरम्यान, महापौर माळवी यांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा