आघाडी अन् युतीचा बोऱ्या उडाल्याने सर्वत्र रंगलेल्या बहुरंगी लढतींमध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या कराड दक्षिण मतदारसंघाचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपल्याने निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूकही वाढली असून, दिवाळीच्या तोंडावरील या निकालासाठी पैजांची चलती राहिली आहे. तर, कराड दक्षिणनजीकच्या पाटण व माण या दोन्ही मतदारसंघातील लढती चुरशीने लढल्या गेल्या आहेत. या निकालांकडेही सर्वाच्या नजरा लागून आहेत.
काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरत असताना, काँग्रेसचेच ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व दिवंगत काँग्रेसनेते विलासराव देशमुखांचे जावई यांनी अनुक्रमे अपक्ष व भाजपमधून निवडणुकीला सामोरे जात पृथ्वीराज चव्हाणांच्या उमेदवारीला त्यांनी अगदी सुरुवातीपासून कडवे आव्हान दिले होते. परिणामी कराड दक्षिणची लढत काटय़ाची टक्कर अशीच होणार हे नक्की झाले. अशातच शिक्षणसम्राट डी. वाय. पाटील यांचे पुत्र डॉ. अजिंक्य यांनी शिवसेनेकडून उमेदवारी आयात करीत नवखे उमेदवार म्हणून कराड दक्षिणमधून उमेदवारी दाखल केली. डॉ. अजिंक्य पाटील वगळता अन्य तिन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. लक्ष्मीदर्शनाचाही लाभ काही ठिकाणी मतदारराजाला घडून गेला. बाहुगर्दी सभा गाजल्या. अस्तित्वाची लढाई इर्षेने लढली गेली. परिणामी कराड दक्षिणची लढत सर्वदूर बहुचर्चित राहिली. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व करीत असल्याने आणि त्यांच्याच उमेदवारीला काँग्रेसमधूनच कडवा विरोध झाल्याने साऱ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली. या मतदारसंघात ७३ टक्के मतदान झाले आहे. त्यात शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला तर, ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढल्याने तर्कवितर्काना उधाण आले असून, दावे-प्रतिदावे, पैजा यांची चलती राहिली आहे. चोख बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल घोषित होईल असे प्रशासनाने म्हटले आहे. अवघ्या महाराष्ट्राचे या प्रथम क्रमांकाच्या लढतीकडे गांभीर्याने लक्ष राहणार आहे.

Story img Loader