हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारा आढळून आलेल्या अज्ञात बोटीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रक जारी करुन सविस्तर माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये या बोटीसंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली असून ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याचं या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ ऑगस्ट २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धमधील हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यावेळी या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स आणि रायफल दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निर्दर्शनास येताच तातक्ाल किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देशण्यात आले आहेत. तसेच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.

या बोटीबद्दल तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचं नाव ‘लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक असणाऱ्या हाना लॉर्डगन यांच्याकडे आहे. हाना यांचे पती जेम्स हॉबर्ड हे या बोटीचे कप्तान असून ही बोट ओमानची राजधानी असणाऱ्या मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र २६ जून रोजी सकाळी १० वाजता या बोटीचे इंजिन निकामी झाल्याची माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

यानंतर बोटीतील खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी एक वाजता एका कोरियन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानच्या ताब्यात दिले. समुद्र खवळलेला असल्याने या ‘लेडीहान’ बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे, असंही फडणवीस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक हे दोघेही मिळून करत असून आगामी सणांच्या पार्श्वबूमीवर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

भारतीय कोस्टगार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्कात असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत असल्याचंही गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious speed boat found in raigad ats to probe maharashtra home minister devendra fadanvis gives details scsg