अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी खचला असून, त्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी केंद्राने विशेष कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासह पीक कर्ज, यावर्षीचे मध्यम मुदत कर्ज आणि वीजदेयक माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग आले होते. ओझर विमानतळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची सूचनाही संघटनेचे जिल्हा प्रवक्ते हंसराज वडघुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. विमानतळावर सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असता ते गाडीत बसून निघून चालले होते. संघटनेचे वडघुले, नितीन रोटे पाटील, किरण देशमुख आदींनी आरडाओरड केल्यावर थोडा वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांशी १० मिनिटे चर्चा केली. वडघुले यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असून शासनाने आपदग्रस्तांना आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक कर्ज संपूर्ण माफ करावे, नुकसानग्रस्तांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी विशेष निधी, सवलती द्याव्यात, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा, प्रचलित सुधारित विमा पद्धत लागू करावी, जमीन अधिग्रहणाचा कायदा रद्द करावा, अशा मागण्यांविषयी चर्चा केली.
सिंग यांनी आम्ही ‘अच्छे दिन’चे दिलेले वचन पूर्ण करण्यास कटिबद्ध असून त्यासाठी शासनाला पुरेसा वेळ देण्याचे आवाहन केले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री एकनाथ खडसे, माणिकराव कोकाटे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंग कुशवाह उपस्थित होते.
यावेळी निफाड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ८० वर्षांचे कार्यकर्ते शिवाजीबाबा राजोळे यांनी मंत्र्यांना निवेदन देताना कुठे गेले अच्छे दिन, शेतकऱ्यांना ठोस हमी द्या, अशी घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी त्यांना सावरत शांत केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी खचला असून, त्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी केंद्राने विशेष कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

First published on: 23-03-2015 at 01:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani demands free farmers from debts