स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदरप्रश्नी कराड येथे आंदोलनास ठाम राहिले असून, भाजप, शिवसेना व मनसेनेही आंदोलनात उडी घेतल्याने वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या येथील निवासस्थानावर युतीतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचे आज सदाभाऊ खोत यांनी जाहीर करून संघर्षांच्या उकळीला पहिला ताव दिला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चारित्र्यसंपन्न असल्याचा ठाम विश्वास आहे. पण कर्तबगार नाहीत, त्यांची रोखठोक भूमिका नाही अशा मुख्यमंत्र्यांचे करायचे काय, अशी सरळसोट टीका करून, पोकळ भूलथापा देण्याऐवजी उसाला छातीठोक भाव द्या असे आव्हान खोत यांनी दिले आहे. दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती १०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यात आपत्कालीन सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व मार्ग जाम करण्यात आले असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.    
वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक आंदोलनाची भूमिका आणि त्याला भाजप, शिवसेनेच्या महायुतीसह मनसेचे समर्थन मिळाल्याने आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. या पाश्र्वभूमीवर उद्याचा मुख्यमंत्र्यांच्या घरावरील मोर्चा व परवा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी महाराष्ट्रभरातील १ लाखावर ऊसउत्पादकांचे न्याय्य मागण्यांसाठीचे ठिय्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व लोकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीसदल व प्रशासनाने कंबर कसली आहे. या पाश्र्वभूमीवर काल रात्री पोलीस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होऊन जनतेला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून विचारविनिमय करण्यात आला. पोलिसांची निश्चितच सामंजस्याची भूमिका राहील. आत्तापर्यंत आमच्याकडे कोणीही मोर्चा, आंदोलन अथवा मेळावा यासाठी परवानगी मागितली नसल्याचे पोलीस उपअधीक्षक  मितेश घट्टे व तहसीलदार सुधाकर भोसले यांनी स्पष्ट केले आहे, तर प्रशासनाच्या नेमक्या रणनीतीसंदर्भात माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज सायंकाळी रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वासह सहकाऱ्यांना पत्रकार बैठकीत लक्ष्य केले. गतवर्षी आम्ही आंदोलनात आणि कारागृहाची हवा खात असताना, हे शेतकरी पुढारी प्रसारमाध्यमांसमोर जाऊन प्रसिद्धी मिळवत होते. ऊसदरवाढीचे श्रेय लाटण्यात आघाडीवर होते. आम्ही लोकसभेसाठी ऊसदराचे राजकारण करीत असल्याची टीका करण्यापेक्षा आपण ग्रामपंचायतीला तरी निवडून येण्याच्या लायकीचे आहात का? हे तपासण्याचे आव्हान खोत यांनी रघुनाथदादा पाटील व शंकरराव गोडसे यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर साडेतीन हजार रुपये दर मिळणार असेल तर या शेतकरी नेत्यांना आम्ही खांद्यावर घेऊन नाचू, त्यांचे नेतृत्व स्वीकारू अशी खिल्ली खोत यांनी उडवली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास खासदार राजू शेट्टी टाळाटाळ करीत असल्याबाबत छेडले असता, पूर्वनियोजित सभांचे कारण समोर करीत खोत यांना समर्पक उत्तर देता आले नाही.  
परवा रात्री मुंबई दरबारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने आणि भूलथापांना आम्ही भीक घालत नसून, उसाचा पहिला हप्ता छातीठोक जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनेला सामोरे या असे खडे आव्हान खोत यांनी दिले आहे. कोणी म्हणत असेल की मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी कराडात आंदोलन होतंय, तर ते चुकीचे आहे. दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ रुजवली, वाढवली, सहकाराची घडी बसवली, मात्र आज त्यांचे चेले म्हणवणारे या चळवळीला वेगळे स्वरूप देत आहेत. म्हणून यशवंतराव चव्हाणांच्याच समाधीसमोर आम्ही ऊसदराचा न्याय मागणार आहोत. आजवर माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, मनोहर जोशी या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला ऊसशेतीविषयी फारशी माहिती नसतानाही त्यांनी ऊस उत्पादकांसाठी न्यायाचे निर्णय घेतले. जोशी सरांनी झोन बंदीच्या बेडय़ा तोडल्या. सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यशवंतराव चव्हाणांच्याच घरामधील असून, साखरसम्राटांच्या व मित्रपक्षांच्या दबावाखाली असल्याने योग्य ऊसदराचा निर्णय घेऊ शकत नाहीत. तरी मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवावी. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. ऊसदरासाठी आम्ही उद्याच्या मोर्चात सामील होणार असून, आमच्या न्याय्य मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेही समर्थन मिळाल्यास त्यांनाही बरोबर घेऊ असा निर्वाळा त्यांनी दिला. कराड येथील आंदोलनादरम्यान, प्रशासनाने सुसंवाद साधावा अशी अपेक्षा व्यक्त करताना टोकाची भूमिका घेतल्यास रक्त सांडेल आणि शेतकऱ्यांच्या या रक्ताने मुख्यमंत्र्यांचे हात बरबटले जाणार आहेत आणि हे रक्ताचे डाग कोणत्याही साबणाने धुतले जाणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी ऊसदराची रोखठोक भूमिका घ्यावी. आमचे त्यांना समर्थन राहील. त्यासाठी आम्ही बैठकीला असायलाच पाहिजे असे नाही, तरी केवळ पोकळ आश्वासने देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी छातीठोक भूमिका घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा