विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप झाले नसताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाने कांदा आणि डाळिंब यांना मिळणाऱ्या कमी भावामुळे केंद्र सरकारची कोंडी करण्याचे ठरविले असून मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढणारा असंतोष विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप-सेनेसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जानेवारी, मे या महिन्यांमध्ये झालेली गारपीट आणि तेल्या रोगामुळे डाळिंब उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे. दुसरीकडे कांद्यालाही फारसा भाव नाही. त्यामुळे उत्पादनाचा खर्चही भरून निघणे अवघड झाल्याने यास केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. शासनाने निर्यातबंदी उठवावी व हमीभाव जाहीर करावा अशी मागणी संघटनेचे हंसराज वडघुले यांनी येथे आयोजित जिल्हा बैठकीत केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, बापू जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी कांदाप्रश्नी केंद्र सरकारच्या आयात धोरणावर सडकून टीका केली. केंद्र सरकार इजिप्तचा व अफगाणिस्तानचा कांदा तीन हजार रुपये प्रतिक्विंटल खरेदी करत आहे. तर, जिल्ह्य़ातील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना कांदा अवघा ५०० रुपये क्विंटल या कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याचे पगार यांनी निदर्शनास आणून दिले. राज्य शासनाने कांदा चाळींसंदर्भात चुकीचा अहवाल केंद्र शासनास पाठविला आहे. खासगी कांदा चाळीची माहिती केंद्रास पाठविली गेली नाही. राज्यात मोठय़ा प्रमाणावर कांदा शिल्लक असताना शासनाने इजिप्तमधून ६१० टन, अफगाणिस्थानमधून ७०० टन कांदा महागडय़ा दराने का आयात केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्राहकांची मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी मागील वर्षी ७० ते ८० किलो दराने विकल्या जाणाऱ्या डाळिंबाला यंदा केवळ २० ते ३० रुपये दर मिळत असल्याचे सांगितले. वर्षांच्या प्रारंभी गारपिटीने बागा उद्ध्वस्त झाल्या. तर, मे-जून महिन्यांत तेल्या रोगाने ७० टक्के बागांचे नुकसान झाले. अशातच वाचलेल्या डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यास केंद्र शासन कारणीभूत असून सरकारने या महत्त्वाच्या पिकांसाठी सीमाबंदी लागू केल्यामुळे पिकांना भाव मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने मंगळवारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा