महायुतीत सहभागी होऊन दबावगटाचे राजकारण करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इरादा येथे आयोजित जिल्हा पातळीवरील दुष्काळी परिषदेत स्पष्ट झाला. चळवळीची शक्ती वाढावी, या साठीच आमचे राजकारण आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी सांगितले. कोणतेही सरकार आले, तरी ते दबावगटाच्या बाजूने असते. कांदा-बटाटय़ावरील निर्यातबंदीचा निर्णय केंद्राने ग्राहकांच्या दबावामुळे घेतल्याचे उदाहरण त्यांनी या अनुषंगाने दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी विकासाचे दरवाजे उघडायचे असतील तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा देऊन केंद्र सरकारने शेतीमालाच्या आधारभूत भावात दीड ते दोन टक्के केलेल्या वाढीबद्दल विरोध दर्शविला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर आपल्या विचारांची माणसे सरकारमध्ये हवीत, असेही ते म्हणाले. जनुकीय बदल करून तयार केल्या जाणाऱ्या पिकांच्या वाणांच्या चाचण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अशास्त्रीय असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. महायुतीच्या जाहीरनाम्याबाबतची अपेक्षाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून व्यक्त झाली. राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात असले पाहिजे. शासकीय अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थांचे राष्ट्रीयीकरण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
खा. शेट्टी म्हणाले की, राज्यातील सहकारी भू-विकास बँक तेथील पुढाऱ्यांमुळे बंद पडली. या बँकेची राज्यात १३ हजार कोटींची मालमत्ता असून ती हडपण्याचा काही मंडळींचा डाव आहे. राज्यात ५८ सहकारी साखर कारखान्यांची विक्री झाली. मागील १० वर्षांत राज्यात ज्या सहकारी संस्थांचा लिलाव झाला, त्याची चौकशी करण्याचे आश्वासन महायुतीने वचननाम्यात द्यावे, असे संबंधितांना आपण सांगितले आहे. ते म्हणाले की, परमिट नाही म्हणून काळी-पिवळी गाडी, जीप व छोटा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर अवैधतेचा शिक्का बसतो. वास्तविक, एस. टी. प्रवासात होतो तेवढा त्रास या वाहनांतून होत नाही. सरकारने परमीटसाठी आठवी उत्तीर्णची चुकीची अट घातली आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात या संदर्भात आश्वासन द्यावे लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यात लक्ष घालण्याबाबत पत्र लिहिल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
‘शरद जोशींभोवती बडव्यांची औलाद’!
शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतील काही कार्यकर्त्यांनी या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. ‘जोशी यांच्याभोवती बडव्यांची औलाद जमा झाली आहे,’ असा आरोप पक्षात प्रवेश केलेल्यांपैकी गजानन बंगाळे यांनी भाषणात केला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील विखे व थोरात यांच्यामुळे मराठवाडय़ास जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळत नाही. जिल्ह्य़ात सर्वपक्षीय पुढाऱ्यांची अभद्र युती असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा