तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट असल्याच्या पाश्र्वभूमीवर टंचाईचे चटके बसणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित ठेवले जात असून मागील वर्षीचे गारपीट अनुदानही मिळाले नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे तहसीलदारांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देवीदास देवरे, विशाल वडघुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नंतर तहसीलदारांच्या दालनात प्रवेश करीत उपस्थित असलेल्या येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तहसीलदार अनिल गवांदे यांचे लक्ष वेधले. उपविभागीय अधिकारी माळी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारले व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी अप्पा झाल्टे, सुनील आहेर, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

Story img Loader