स्वाभिमानचा हट्ट आणि काँग्रेसच्या भूमिकेवर भवितव्य ठरणार

प्रशांत देशमुख, वर्धा

नाममात्र प्रभाव असणाऱ्या विदर्भात जागांची मागणी करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका चर्चेत असून ‘आयात’ उमेदवारांसाठी संघटनेचा हट्ट व काँग्रेस आघाडीचा या जागेवरचा दावा सोडण्याची तयारी अनाकलनीय आहे.

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतून लोकसभा निवडणुका लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सशर्त तयार आहे. त्यात हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, सांगली, कोल्हापूर व नंदूरबार या जागा संघटनेस हव्या आहेत. तसेच आघाडीच्या जाहीरनाम्यात नोंद व पुढे सत्ता आल्यावर संपूर्ण कर्जमुक्ती तसेच दीडपट हमीभाव याचे विधेयक आणण्याची हमी संघटनेस हवी आहे.

चर्चेतील पहिल्या टप्प्यात वर्धा, बुलढाणा व हातकणंगले या तीन जागांचा आग्रह धरण्यात आला. वर्धेऐवजी सांगली स्वीकारण्याचीही तयारी दर्शविण्यात आली. मात्र तीनपेक्षा कमी नाहीच, तसेच संघटनेने विदर्भातील दोन जागांसाठी आग्रह धरला आहे. विशेष म्हणजे त्यास प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याच जागेसाठी काँग्रेसकडे शब्द टाकण्याची भूमिका घेतली. काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार चारुलता टोकस यांच्या मातोश्री प्रभा राव यांचे पवारांशी असलेले राजकीय वैर होते. त्यातच सर्वपक्षीय संबंध असणाऱ्या दत्ता मेघेंचे चिरंजीव सागर मेघे यांची भाजपतर्फे  उमेदवारी येण्याची बाब गांभीर्याने घेतली जाते.

विदर्भात स्वाभिमानी संघटनेने अलिकडच्या काळात पाय रोवणे सुरू केले. बुलढाण्यात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जम बसविला. तुपकारांसाठी राजकारणातील यश अद्याप दूर आहे. ते साधण्याची संधी लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पूढे आली आहे. पक्षनेते खा. राजू शेट्टी यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या तूपकर यांनी वाशिम, अकोला, यवतमाळ भागात गत आठवडय़ात सभाही घेतल्या.

स्वाभिमानी वर्धेच्या जागेसाठी हट्ट धरून आहे. अभियंता म्हणून शासनाच्या सेवेत असतानाच तत्कालीन मंत्री महादेवराव शिवणकर यांचे सचिव म्हणून राजकीय वर्तुळास परिचित सुबोध मोहिते यांनी लगेच शिवसेनेत प्रवेश केला. रामटेकमधून खासदार होत सेनेकडून केंद्रात मंत्रिपद पटकावले. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विनायक मेटेंच्या शिवसंग्राममध्ये ते काहीकाळ विसावले. दोनच वर्षांपूर्वी ते स्वाभिमानीचे झाले.

वर्धा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. आघाडीत ही जागा काँग्रेसकडेच राहण्याचा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी मला दिला आहे. मित्र पक्षांसाठी सांगली किंवा अन्य पर्याय असू शकतात. जेष्ठ नेते शरद पवार यांना भेटून मी आशीर्वाद घेतले आहेत. माझ्या नावावर कुणाचे आक्षेप असण्याचे कारण नाही.

– चारुलता टोकस, काँग्रेस नेत्या

आमचा पक्ष लोकवर्गणीतून निवडणुका लढवितो. मोहिते यांचा राजकीय अनुभव पाहून त्यांना उमेदवारी देण्याबाबत विचार झाला. वर्धा मतदारसंघास शेतकरी चळवळीचा इतिहास असल्याने आम्ही वर्धेची मागणी केली आहे. काँग्रेस आघाडीसोबत वाटाघाटी सुरू आहेत. लवकरच त्याबाबत निर्णय लागेल. 

रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी

Story img Loader