लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना तयारीला लागल्याचं चित्र असतानाच ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी नाही तर खासदारकीसाठी काम करत असल्याचा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला होता. आता त्यांच्या या टिकेला राजू शेट्टी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “मी कडकनाथ सारखे घोटाळे करून ससंसदेत जात नाही”, असा टोला राजू शेट्टींनी लगावला आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले?

“खासदार होणं हा काय गुन्हा नाही किंवा वाईट नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी खासदार व्हायचं असतं. मी चारवेळा लढलो पण दोन वेळा यश मिळालं. आता पुन्हा लढत राहणार आहे. कारण मला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. संसदेत जाण्याची महत्त्वकांक्षा बाळगली तर त्यात गैर काय?”, असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

हेही वाचा : “मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका”, मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप; नेमकं प्रकरण काय?

“मी कडकनाथ सारखे घोटाळे करून जात नाही. कोणाचे पाय धरून जात नाही. मी स्वत:च्या हिमतीवर आणि सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन करून आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून संसदेत जाण्याचा प्रयत्न करतो. आता ज्यांना वाईट वाटतं त्यांनीही संसदेत जाण्याचा प्रयत्न करावा. लोक ठरवतील कोणाला संसदेत पाठवायचं”, असं आव्हान राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना दिलं आहे.

सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?

“जो माणूस म्हणत होता की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मी कोणत्याही आघाडीत जाणार नाही. मी शेतकऱ्यांसाठी लढत असून मी शेतकऱ्यांचा उमेदवार आहे. पण त्याच माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना लिहून दिलं होतं की, मी तुमचा गुलाम राहणार आहे. फक्त मला पाठिंबा द्या. राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगायचे की त्यांच्याविरोधात लढायचं. हे ते उघड बोलले आहेत. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते तर ते फक्त खासदारकीसाठी लढत होते”, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला होता. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या या टिकेला आता राजू शेट्टींनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.