कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि स्थानिकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. काही नेत्यांनीही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्यावतीने कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं. नागपूर ते गोवा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द देतात आणि नंतर तो शब्द सोयीस्करपणे विसरतात’, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू शेट्टी काय म्हणाले?

“मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. त्यामुळे कसलीही अपेक्षा न ठेवता मी शेतकऱ्यांसाठी लढतो. काही शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल तरीही मी माझं काम करत राहणार आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, केवळ निदर्शने केली म्हणून सरकारने टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्या. मात्र, तरीही सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. मग शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं?”, असा सवाल राजू शेट्टी यांनी उसाच्या एफआरपीच्या प्रश्नावरून केला.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “फेरआखणी…”

शक्तीपीठ महामार्गाबात राजू शेट्टी काय म्हणाले?

“राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती सोहळा सरकार साजरा करणार आहे. मात्र, दुसरीकडे राजर्षी शाहू महाराजांच्याच जिल्ह्यात आज शेतकरी भूमिहीन होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. आता विधानसभेच्या तोंडावर अडचण येईल म्हणून महामार्गाचे भूसंपादन थांबवलं असं सांगतात. मात्र आम्हाला ही स्थगिती नको तर रद्द करण्याची आमची मागणी आहे. आम्ही आता राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती निमित्त शेतकऱ्यांची कैफियत म्हणून पदयात्रा काढणार आहोत. २६ जूनला दीडशे शेतकरी घेऊन ही पदयात्रा काढली जाणार आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द देतात मात्र नंतर सोयीस्करपणे तो विसरतात. सरकारला शाहू महाराजांनी सुबुद्धी द्यावी, यासाठी आम्ही ही पदयात्रा काढणार आहोत. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. एखादी बातमी व्हावी म्हणून आम्ही काही काम करत नसतो. विषय संपला असे म्हणून तो संपत नसतो. शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी चालला आहे? कोणी मागणी केली आहे? वाहतुकीची समस्या कुठे निर्माण झाली आहे? सध्या जो महामार्ग आहे तो तोट्यात आहे. आता काहीजण सांगतात की भविष्याचा वेध घेऊन आम्ही हा महामार्ग करत आहोत. मग २२ वर्षांनी करा आत्ता नको”, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani shetkari sanghatana president raju shetti criticized cm eknath shinde and kolhapur shaktipeeth expressway gkt
Show comments