गेल्या काही दिवसांत देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरातील अनेक गोष्टींच्या किमती गगनाला भीडत आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. उद्या (२७ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इचलकरंजी येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत.
वाढती महागाई, खराब रस्ते, बेरोजगारी आणि यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, “घरगुती वीजदरासह सर्व प्रकारचे वीजदर वाढले आहेत. विजेचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरानेही शंभरी गाठली आहे. गॅस ११५० रुपयांच्या वर गेला आहे. रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाईने प्रचंड उच्चांक गाठला आहे. मुलांची फी भरण्यासाठी बापाकडे पैसा नाही आणि शैक्षणिक कर्ज द्यायला बँकाही तयार नाहीत.”
हेही वाचा- एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या अडचणींत वाढ, खारघर घटनेप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल
“अशा अवस्थेत सामान्य माणसानं जगायचं कसं? म्हणून हा जनआक्रोश आयोजित केला आहे. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता इचलकरंजीच्या राजवाडा चौकातून प्रांत कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढायचा आहे. ज्याला-ज्याला महागाईची झळ बसली आहे. ज्याला वाटतं की, हे जे सगळं चाललंय, ते बरोबर नाही, अशा सगळ्यांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं आहे,” असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.