स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काहीही संबंध राहिला नसल्याची घोषणा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. रविकांत तुपकर यांनी अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारावाई करण्यात आल्याचं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
रविकांत तुपकर यांच्यावरील कारवाई संदर्भात बोलताना जालिंदर पाटील म्हणाले, “रविकांत तुपकर यांनी काही राजकीय बैठका आयोजित केल्या आहेत. मात्र, त्याबाबत संघटनेला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. गेल्या चार वर्षात एकाही ऊस परिषदेला रविकांत तुपकर उपस्थित राहिले नाहीत. संघटनेच्या एकाही कार्यकारिणीच्या बैठकीला ते हजर राहिले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकाही आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले नाहीत. आतापर्यंत चार वर्ष आम्ही वाट पाहिली. पण आता आम्ही वाट पाहू शकत नाहीत. आजपासून रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काहीही संबंध नाही”, असं जालिंदर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो,
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) July 22, 2024
पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो….
माहिती आहे मला पुढची तुझी खेळी,
मी तुला आतून बाहेरून ओळखतो… pic.twitter.com/1qksMvwNPu
दरम्यान, या कारवाईवर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देत माझा काय गुन्हा होता, मला एवढी मोठी शिक्षा दिली, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फेसबुकवर एक सूचक पोस्टही केली आहे. “संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो…. माहिती आहे मला पुढची तुमची खेळी, मी तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो…”, अशा आशयाची फेसबुक पोस्ट रविकांत तुपकर यांनी केली आहे.
रविकांत तुपकर काय म्हणाले?
“मला अजून त्यांचं अधिकृत कोणतंही पत्र आलेलं नाही. मात्र, दु:ख एकाच गोष्टीचं आहे. आम्ही हातावर शिर घेऊन लढत राहिलो. घरादारांवर तुळशीपत्र ठेवलं. लाठ्याकाठ्या खाल्या, तुरुंगात गेलो. माझ्या लेकरांना आणि आई वडिलांना अंतर दिलं. पण संघटनेचं नाव आम्ही महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचवलं. एक-एक वर्ष आणि सहा-सहा महिने आम्ही घर सोडून राहिलो. पण त्याचं फळ राजू शेट्टी असं देतील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझा काय गुन्हा होता? मला त्यांनी एवढी मोठी ही शिक्षा दिली”, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.