३ हजार ७७५ टन कचऱ्याचे संकलन
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत राज्यभरातील १ लाख ४१ हजार ५९३ लाखो श्री सदस्य सहभागी झाले. यावेळी विविध भागात ३ हजार ७७५ टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छतेकडून समृध्दीकडे असा त्यांनी संदेश दिला. थोर निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या महास्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील ११ राज्यातील ५३ जिल्ह्य़ात ही मोहिम राबविण्यात आली. मोहिमेअंतर्गत १७९ शहरे आणि ५४६ गावांची स्वच्छता करण्यात आली. या मोहीमेत जवळपास दिड लाख श्री सदस्य स्वयंप्रेरणेनी सहभागी झाले. ४ हजार २८३ किलो मिटर लांबीचे रस्ते २५ किलो मिटर लांबीचे समुद्र किनारे आणि ११५ रेल्वे स्थानके यावेळी श्रमदानातून स्वच्छ करण्यात आली. यावेळी २ हजार ७६७ टन सुका कचरा तर ९८८ टन ओला कचरा संकलित करण्यात आला.
एकाचवेळी राज्यातील १४८ शहरे १ हजार ४३४ सरकारी कार्यालये, १०५ रेल्वे स्टेशनवर हि मोहिम राबविण्यात आली. रस्त्याच्याकडेला उगवलेली रानटी झाडे, वेली दूर करण्यात आली. शहरांतील विविध भागात पडलेला कचरा, पालापाचोळा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कचरा संकलित करण्यात आला. तब्बल टनभर कचरा सदस्यांनी श्रमदानातून संकलित केला.
या स्वछता मोहिमेची सुरुवात रेवदंडा येथून सकाळी सात वाजता सुरु करण्यात आली. सचिनदादा धर्माधिकारी यांनी स्वत या स्वछता मोहिमेत सहभागी होऊन पारनाका येथील स्वच्छता करून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते, शरद गोंधळी व समस्त व्यापारी वर्ग तसेच हजारो श्री सदस्य उपस्थित होते. अलिबाग शहरात प्रकाशभाऊ धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने स्वछता हा उपक्रम धर्म म्हणून जोपासला पाहिजे. स्वच्छतेचे महत्व सर्वानाच ठाऊक आहे पण सुरुवात कोणी करावयाची हा खरा प्रश्न आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपले घर, आपले गाव आपले शहर कसे स्वच्छ राहिल याकडे सर्वानी लक्ष्य देण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छता ही सामुदायिक जबाबदारी आहे आणि ती सर्वानी पार पाडली पाहीजे, स्वच्छतेबाबत जेव्हा सामाजिक जाणिव निर्माण होईल, तेव्हा या मोहिमेची व्याप्ती खऱ्या अर्थाने वाढेल असा विश्वास यावेळी सचिनदादा धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.