Swapnil Kusale Bronze Medal: कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेनं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला. महाराष्ट्रासाठी खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातली. हे पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने स्वप्नील कुसाळेला एक कोटींचं बक्षीसही जाहीर केलं. पण आता स्वप्नील कुसाळेला एक कोटीऐवजी पाच कोटींचं बक्षीस मिळावं अशी मागणी त्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी केली आहे. तसेच, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर पक्षपाती असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला आहे.

सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत स्वप्नील कुसाळेला ५ कोटींचं बक्षीस मिळावं, अशी मागणी केली आहे. “स्वप्नीलला पदक मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पण ती तोकडी आहे अशी आमची भूमिका होती. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळानं ५ कोटी सुवर्णपदकाला, ३ कोटी रौप्य पदकाला, २ कोटी कांस्य पदकाला जाहीर केलं. पण हे सरकारनं ऑलिम्पिक सामने चालू होण्यापूर्वीच जाहीर करायला हवं होतं”, असं सुरेश कुसाळे म्हणाले.

“स्वप्नील आमदाराचा मुलगा असता तर काय केलं असतं?”

दरम्यान, स्वप्नील सामान्य घरातला असल्यामुळेच त्याला कमी बक्षीस दिलं, असा दावा सुरेश कुसाळे यांनी केला आहे. “आता मला वाटायला लागलं आहे की स्वप्नील एका सामान्य कुटुंबातला आहे, त्याला राजकीय पाठिंबा नाही म्हणून तुम्ही त्याला एवढं तोकडं बक्षीस दिलं का? हाच मुलगा एखाद्या मंत्र्याचा किंवा आमदाराचा असता, तर तुम्ही काय केलं असतं? माझी मागणी आहे की राज्य सरकारने किमान त्याला ५ कोटी रुपये बक्षीस द्यावं. बालेवाडीपासून जवळ फ्लॅट मिळावा, तिथल्या रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं अशा अनेक मागण्या आहेत. आगामी काळात त्याला सुवर्णपदक जिंकायचं आहे”, अशा मागण्या सुरेश कुसाळे यांनी मांडल्या.

“स्वप्नीलला एक फूलही दिलेलं नाही”

दरम्यान, अद्याप स्वप्नीलचा विधानभवनात सत्कार झाला नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाचव्या दिवशीच विधानभवनात आमच्या सरकारनं महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना बोलवून ११ कोटींचं जाहीर केलेलं बक्षीस त्यांना दिलं. पण आता ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकून दोन महिने सहा दिवस झाले आहेत. पण शासनानं अजून त्याला विधानभवनात बोलवून एक फूलही दिलेलं नाही. त्यांना ऑलिम्पिक पदकाची काही किंमत आहे की नाही हा मला प्रश्न आहे”, अशा शब्दांत कुसाळेंनी नाराजी बोलून दाखवली.

Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

“तर मी स्वप्नीलला नेमबाजीसाठी पाठवलंच नसतं”

“स्वप्नीलचा आगामी काळातला खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे ५ कोटींशिवाय पर्याय नाही. माझ्या अंदाजे २०२८ पर्यंत त्याला लागणारा खर्च ३ कोटींपर्यंत जाईल. आता त्याला साधी बंदूक घेऊन चालणार नाही. त्याला चांगल्या प्रकारची बंदूक घ्यावी लागेल. दिवसाला त्याला २५०-३०० काडतुसं फायर करावी लागतील. त्या एका काडतुसाची किंमत १०० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे एका दिवसाचा फक्त काडतुसांचा खर्च ३० हजारापर्यंत जाते. नेमबाजीचा हा खर्च आमच्यासारख्या सामान्य माणसाला परवडणारा नाही. जर शासन इतकं उदासीन असतं हे मला माहिती असतं, तर मी माझ्या मुलाला नेमबाजी करण्यासाठी पाठवलं नसतं. कारण मी इतका मोठा नाहीये”, असंही सुरेश कुसाळे म्हणाले आहेत.