सांगली : सांगलीतील कृष्णाकाठच्या माईघाटावर पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या जलतरणपटूवर सोमवारी सकाळी मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कृष्णाकाठ पुन्हा एकदा धास्तावला आहे.
याबाबत माहिती अशी – कृष्णा जलतरण क्लबचे शरद जाधव हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी माई घाटाजवळ पोहण्यासाठी नदीत उतरले होते. पोहत असताना सांगलीवाडीच्या बाजूला जाधव यांच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांचा उजवा पाय जबड्यात धरला होता. जाधव यांनी ताकदीने मगरीच्या जबड्यातून आपला पाय सोडवून घेत नदीचा काठ गाठला. या वेळी त्यांच्यासमवेत आणखी काही तरुण पोहण्यासाठी नदीत उतरले होते. त्यांनी जाधव यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
जाधव यांच्यासह क्लबचे काही सदस्य रोजच नदीत पोहण्यासाठी जात असतात. वाढत्या उन्हामुळे नदीत पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जाधव यांनी सांगितले, की गेल्या आठ दिवसांपासून मगरीचे या परिसरात दर्शन होत आहे. मात्र, आज प्रत्यक्ष मगरीने हल्ला केला. धाडसाने हा हल्ला परतवत काठ गाठल्याने बचावलो. गेल्या आठवड्यात २ एप्रिल रोजी अंकलखोप येथील अजित गायकवाड या तरुणाचा भिलवडी परिसरात नदीत पोहत असताना मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.