सावली येथील स्वाईन फ्लूचा रुग्ण संतोष पगडपल्लीवार (४२) यांचे आज पहाटे नागपूर येथे निधन झाल्याने आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सकांनी सावली येथे डॉ.बंडू रामटेके यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात केले असून पगडपल्लीवार यांच्या घराभोवताल राहणाऱ्या सर्वाची व सात दिवसापासून सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, २० जणांना लक्षणे आढळून आली आहेत.
सावली येथील शिक्षक संतोष पगडपल्लीवार यांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रविवारी चंद्रपुरातील डॉ.विश्वास झाडे यांच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ.झाडे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय येताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून फ्लूच्या रुग्णांना देण्यात येणारी टॅमीप्ले ही टॅबलेट मागवून दिली. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने सोमवारी सकाळी त्यांना नागपुरात शासकीय वैद्यक महाविद्यालयात हलविण्यात आले. आज पहाटेच पगडपल्लीवार यांचा मृत्यू झाला. आज दुपारी सावली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आता आरोग्य विभागाने सावली येथे आरोग्य पथक तैनात केले आहे. पगडपल्लीवार यांच्या घरासभोवतालच्या सर्वांची आरोग्य तपासणी करणे सुरू केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मुंब्रानीकर व डॉ.गोगुलवार यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
या पथकाचे प्रमुख डॉ.बंडू रामटेके आहेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर सहकारी कर्मचारीही तैनात केले आहेत. स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारच्या श्वसन संस्थेचे लक्षणे आढळून येतात. विशेषत: बालरुग्णामध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये ताप आढळत नाही. त्यामुळे पगडपल्लीवार यांच्या घरासभोवतालच्या सर्वाची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, या तपासणीत २० जणांना ही लक्षणे दिसून आली आहेत, तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करयात येणार आहे. पगडपल्लीवार सात ते आठ मित्रांसोबत दहा दिवसांपूर्वी गोव्याला गेले होते. तेथून हा आजार तर घेऊन आले नाही ना, असाही संशय आहे. त्यामुळे या सात-आठ मित्रांचीही आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ.मुंब्रानीकर यांनी दिली. हा आजार सावली व परिसरातील इतर गावात लोकांना झाल्याचाही संशय आहे.