वाई : येथील महागणपती घाटावर परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी व शहरातील सहा मद्य विक्रीची दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याप्रकरणी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास अजय गोपी घाडगे याने दोन्ही हातात तलवारी घेऊन शहरातील मध्यवस्तीतील मद्यविक्रीच्या दुकानात जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुकान चालकांना दमदाटी करून तोडफोड करत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर महत्वाच्या किसन वीर चौक चौकात असणाऱ्या वाईन शॉपमध्ये घुसून येथील फर्निचरची व काचांची मोडतोड केली. दुकानात दहशत माजवत ग्राहकांना बाहेर काढले व दुकान बंद करण्याची साठी धमकी दिली. यानंतर घाडगे याने शहरातील महागणपती घाटावर पाणीपुरी हातगाडी चालविणाऱ्या परप्रांतीय तरुणावर हातातील तलवारीने ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. त्याने वार चुकविण्यासाठी हात समोर धरल्याने झटापटीत पान टपरी चालकाची बोटे तुटली त्याने एका पळत जाऊ नका दुकानाचा आश्रय घेतल्यामुळे तो वाचला. झटापटीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी जाऊन अजय गोपी घाडगे (वय २३, रा लाखा नगर वाई) यास महागणपती पुलालगत ताब्यात घेतले. याप्रकरणी रिंकू मुंनीलाल ठाकूर या पाणीपुरी गाडा चालकाने तक्रार दिली आहे. याशिवाय सागर अशोक फरांदे, केदार रमेश गायकवाड, फैय्याज नासिर खान, किरण दामोदर कांबळे, सतीश बाळासाहेब कांबळे या मद्यविक्रेत्यांनी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर गर्दी होती. सायंकाळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक सुरु होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार करत आहेत.