सांगली: शिराळा येथे आज नागप्रतिमेची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने शिराळा व परिसरात जिवंत सर्पाची हाताळणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वन विभागाने १२ फिरती गस्ती पथके तैनात केली होती.
शिराळा येथे नागपंचमी दिवशी जिवंत नागपूजा करण्याची प्रथा होती. काही वर्षापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागपूजा करणे, सर्पांची हाताळणी करणे बेकायदेशीर ठरवून यावर निर्बंध लागू केले असल्याने या कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी प्रशासनावर आहे. यामुळे गेल्या आठ दिवसापासून वन विभागाने कायद्याचे पालन केले जावे यासाठी शिराळा शहरासह आसपासच्या गावामध्ये प्रबोधन, जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला होता.
हेही वाचा… तलाठी भरतीतील गोंधळावरून रोहित पवार यांची सरकारवर टीका, म्हणाले, “सरकारला गांभीर्य आहे की नाही?”
आजही सर्प हाताळणी होऊ नये यासाठी वन विभागाने गस्ती पथकासह कर्मचारी तैनात केले होते. १० ड्रोन कॅमेरे, २० चलतचित्रीकरण कॅमेरे, चार निरीक्षण मनोरे उभारले होते. उपवन संरक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन विभागीय वनाधिकारी, ४ सहायक वन संरक्षक, १० वन क्षेत्रपाल, २३ वनपाल, ४५ वन रक्षक, ८० वनमजूर असा कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा… “वॉशिंग मशीनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही…”, शिशिर धारकरांचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
शहरातील विविध मंडळाच्यावतीने नागांच्या प्रतिमांची ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उप अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ग्रामदेवता अंबामाता मंदिरामध्ये पूजा आटोपल्यानंतर मानाची पालखी महाजनांच्या घरी पारंपारिक वाद्यांच्या गजरात नेण्यात आली. यावेळी भाविकांनी अंबामातेचा जयजयकार केला.