यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँगेसची उमेदवारी दिवं. काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांना मिळण्याची शक्यता बळावल्याने या मतदारसंघावर पारवेकर घराण्याचेच वर्चस्व राहील, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणूक आयोगाने गेल्या ८ मेपासून पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून भाजपतर्फे मदन येरावार यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. मात्र दोन्ही पक्षांचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असून कडक उन्हामध्ये प्रचाराची जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. पोटनिवडणुकीसाठी २ जूनला मतदान होत असून १५ मे ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.  
यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवण्यासाठी उमेदवाराची निवड करण्याच्या मुद्दय़ावर ज्येष्ठ नेत्यांमध्ये नुकतीच दीर्घकाळ चर्चा झाली. पतीच्या अकाली निधनानंतर निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी यांनी आता रिंगणात उतरण्याची इच्छा प्रकट केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नंदिनी यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी आणि मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तसेच यवतमाळात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांची भेट घेऊन निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितल्यामुळे काँगेसच्या अन्य इच्छुक उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके आणि सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नंदिनींच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केल्याचे समजते. काँग्रेसला पोटनिवडणूक जिंकायची असल्यास नंदिनी पारवेकर यांना जनतेची असलेली सहानुभूती लक्षात घेता उमेदवारी देण्यात यावी, असा विचार करणारा एक वर्ग काँगेसमध्ये आहे. नंदिनी उभ्या राहणार नसतील तर नीलेश पारवेकरांचे धाकटे बंधू योगेश पारवेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी खुद्द योगेश पारवेकर आणि त्यांच्या मातोश्री कांताबाई पारवेकर यांनी मध्यंतरी प्रयत्न केले होते. मात्र आता पारडे नंदिनी पारवेकरांच्या बाजूने झुकले आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी पारवेकर घराण्यातील व्यक्तींच्या उमेदवारीबद्दल मनोगत जाणून घेतल्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दिले आहेत. पारवेकर घराण्यातील नंदिनी किंवा योगेश यांचा विचार न झाल्यास तिसऱ्या क्रमांकावर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.
नंदिनी पारवेकर यांना माहेरचा राजकारणाचा मोठा वारसा असला तरी त्या राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक प्रचार कोण करणार, कसा करणार, अशा अनेक बाबी काँगेसच्या बठकीत चच्रेत आल्या. शनिवारी यवतमाळात माणिकराव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार, माजी खासदार हरिभाऊ राठोड आदी नेत्यांनी काँगेस उमेदवारांच्या नावावर दीर्घकाळ चर्चा केली आणि वेगवेगळय़ा मतप्रवाहांची नोंद घेऊन पक्षश्रेष्ठींकडे अहवाल पाठविल्याचे समजते. भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार मदन येरावार यांचेच नाव आघाडीवर आहे. मदन येरावार या मतदारसंघातून दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते आणि दोनदा त्यांचा पराभवसुद्धा झाला होता. या वेळी सत्तारूढ काँगेसच्या विरुद्ध जनमानसात असंतोष असल्याने ही जागा भाजपा हमखास जिंकेल, असा आशावाद भाजपा नेत्यांनी व्यक्त केला आहे. नंदिनी पारवेकर यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँगेस उमेदवार उभा करणार नाही, असे राष्ट्रवादी काँगेसचे आमदार संदीप बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे. ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेता नंदिनी पारवेकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader