नितीन पखाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • बालरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जोशी यांनी वेधले लक्ष
  • यवतमाळात सहा बालकांना ग्रासले

 

यवतमाळ : करोनाबाधित बालकांना तसेच कोविडचे प्रतिपिंड तयार झालेल्या बालकांमध्ये ‘मल्टिसिस्टम इन्फ्लोमेटरी सिंड्रोम पोस्ट कोविड’ (एमआयएससी) या आजाराची लक्षणे मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याचे निरीक्षण येथील बालरोग तज्ज्ञ तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांनी नोंदवले आहे. बालकांसाठी विदर्भातील पहिले कोविड रुग्णालय सुरू केल्यानंतर त्यांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांमध्ये या आजाराची लक्षणे असलेली सहा बालके आतापर्यंत आढळून आली आहेत.

योग्य निदान होऊन वेळेत उपचार झाल्यास या आजारातून लवकर बाहेर पडता येते, मात्र विलंब झाल्यास रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याचा धोका आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांपेक्षा बाधित होणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. तर आता राष्ट्रीय पातळीवर सरकारी यंत्रणेसह विविध वैद्यकीय अहवालानुसार करोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने शासन, प्रशासन बालकांवरील उपचाराचे नियोजन करीत असताना यवतमाळात ‘एमआयएससी- पोस्ट कोविड’ आजाराची लक्षणे असलेली बालके आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

या आजारात करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर बालकांमध्ये शरीरातील विविध अवयवांवर सूज येऊन हात- पायाची हाडे, डोळे या अवयवांसह हृदयावर दुष्परिणाम होत असल्याचे आढळले. हृदयावर सूज येऊन, हृदयात, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे, अशी लक्षणे आढळतात. बालकांची आई करोनाबाधित होऊन गेल्यानंतर करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या पण शरीरात कोविडची प्रतिपिंड तयार झालेल्या बालकांमध्ये हा आजार बळावत असल्याचे दिसून आल्याचे डॉ. संजीव जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. साधारण ५ ते १५ या वयोगटातील बालकांना हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. बालकांमध्ये साधारणपणे आढळणाऱ्या ‘कावासाकी’ आजारासारखीच ‘एमआयएससी-पोस्ट कोविड’ची लक्षणे आहेत, असे ते म्हणाले.

करोनाच्या पहिल्या लाटेवेळी युरोप, ब्रिटनमध्ये बालकांना या आजाराची लक्षणे आढळली होती. यवतमाळ जिल्ह्यत सप्टेंबर २०२० मध्ये पांढकरवडा तालुक्यात ‘एमआयएससी- पोस्ट कोविड’चा पहिला रुग्ण बालक आढळला होता. डॉ. संजीव जोशी यांच्या जोशी बाल रुग्णालय या बाल कोविड उपचार केंद्रात आतापर्यंत अशी सहा बालके उपचारासाठी आली. त्यातील चौघांवर यवतमाळात उपचार करण्यात आले तर दोघांना नागपूरला पाठवले होते. त्यातील एक बालक दगावले, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली. त्यांच्या कोविड रुग्णालयात गुरुवारीही या आजाराची लक्षणे असलेला एक बालक उपचारासाठी दाखल झाला. करोना रुग्णांची संख्या अधिक व गंभीर परिस्थिती असलेल्या ठिकाणी ‘एमआयएससी- पोस्ट कोविड’ची लक्षणे असलेल्या बालरुग्णांची संख्याही लक्षणीय असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. या आजारावरील उपचार महागडे असल्याने पालकांनी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. वय आणि वजनानुसार बालरुग्णांवर ‘आयव्ही- आयजी’ (इंन्ट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलीन)चे उपचार केले जातात, असे ते म्हणाले. या आजाराची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाही. त्यामुळे बालरुग्ण हाताळणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. बालकांना किंवा घरात पालकांना करोना होऊन गेला असल्यास या वयोगटातील बालकांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. वेळीच निदान व योग्य उपचार झाल्यास हा आजार घाबरण्यासारखा नसल्याचेही डॉ. जोशी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symptoms of misc disease infants with antibodies ssh
Show comments