नांदेड-हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुर्गम ठिकाणी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे अक्षरश: हाल झाले. किनवट तालुक्यात एका केंद्रावर नियुक्त केलेला कर्मचारी जंगली कोल्हय़ाच्या पाठलागातून कसाबसा बचावला. अशा हलाखीच्या स्थितीत यंत्रणेचीही नियोजनशून्यता चव्हाटय़ावर आली. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या महाविद्यालयातील काही प्राध्यापकांची नियुक्ती चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात केल्याचेही समोर आले आहे.
स्वाराती मराठवाडा विद्यापीठांतर्गत कार्यरत प्राध्यापक संघटनेने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या निवेदनात ही कैफियत मांडली आहे. या वेळच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनाही निवडणूक कार्यात जुंपण्यात आले. यातील सुमारे ३५ प्राध्यापकांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यंत्रणेविरुद्ध तक्रार केल्यामुळे खळबळ उडाली. यशवंत महाविद्यालयातील एक प्राध्यापक किनवट मतदारसंघातील एका केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष होते. तेथे नियुक्तीवर असलेला अधिकारी मतदानाच्या दिवशी सकाळी प्रातर्विधीस गेला असता, जंगली कोल्हा मागे लागल्याने त्याचा थरकाप उडाला. नंतर दिवसभर तापाने फणफणत असताना जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकानेही साधी विचारपूस केली नाही. या प्रकाराची आयोगाने गंभीर दखल घ्यावी, असे प्राध्यापक संघटनेचे प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते व उमेदवार अशोक चव्हाण अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेतर्फे हे महाविद्यालय चालवले जाते. पण यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयातील काही प्राध्यापकांची नियुक्ती चव्हाणांच्या भोकर मतदारसंघात केली, असेही आता समोर आले आहे. यंत्रणेत प्रचंड गलथानपणा होता. काही महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांपेक्षा वरच्या पदावर नियुक्त केले. असे असतानाही जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचा उदोउदो सुरू आहे आणि याच पाश्र्वभूमीवर प्राध्यापकांनी चारपानी तक्रारीतून या यंत्रणेचा पंचनामा केला.
मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथून रवाना करताना बसगाडय़ांमध्ये अक्षरश: कोंबण्यात आले. वयस्कर तसेच मधुमेह, रक्तदाब अशा व्याधींनी ग्रासलेल्या केंद्राध्यक्षांना मोठा त्रास झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. मतदान केंद्र, तसेच मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या गैरसोयी व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुका मुख्यालयी परतलेल्या कर्मचाऱ्यांची उपासमार, उपविभागीय अधिकारी, तहसील व तत्सम अधिकाऱ्यांची अरेरावी अशा अन्य बाबींकडेही प्राध्यापकांनी लक्ष वेधले. तक्रारीत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मतदान केंद्राध्यक्षांना दिलेल्या मानधनात तफावत होती. काहींना १९३० रुपये, तर काहींना १९०० रुपये. निवेदनावर प्रा. डॉ. पी. ई. विभुते, प्रा. पी. आर. मिरकुटे, प्रा. अजय गव्हाणे, प्रा. एस. जी. खवास, प्रा. एन. बी. जाधव, प्रा. संगीता घुगे, प्रा. जगदीश कदम, प्रा. डी. डी. भोसले, प्रा. ए. टी. सूर्यवंशी, प्रा. पी. ए. सूर्यवंशी आदींच्या सहय़ा आहेत. संस्थेचे अध्यक्ष प्रमुख उमेदवार असताना त्यांच्याच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर नियुक्त करण्याच्या प्रकारावर कोणत्याही उमेदवाराने आक्षेप घेतला नाही, पण या निमित्ताने यंत्रणेतील अंदाधुंदी समोर आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा