हादरलेल्या वनाधिकाऱ्यांची भिस्त हैदराबादच्या प्रयोगशाळेवर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोनमधील डोनी गावालगतच्या नाल्यात ४ मे रोजी मृतावस्थेत मिळालेल्या अवघ्या दोन-अडीच वर्षांच्या वाघाचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, वन्यजीवप्रेमी आणि वन विभागातही तशीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, या वाघाच्या मृत्यूचे सावट वनाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाने अनेक गोष्टी दडवून ठेवल्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
ताडोबा प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत डोनी हे गाव आहे. येथून एक-दीड किलोमीटरवर जंगलात एका नाल्यात ४ मे रोजी अवघ्या दोन-अडीच वष्रे वयाच्या पट्टेदार वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला होता. प्रस्तुत प्रतिनिधीने तेव्हा घटनास्थळाला भेट दिली असता ताडोबा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासात शवविच्छेदन करून वाघावर अंत्यसंस्कार केले होते. मात्र, आता दबक्या आवाजात वनविभाग, वन्यजीवप्रेमी आणि वन्यजीव संस्थांमध्ये या वाघावर विषप्रयोग करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षात डोनीपासून घटनास्थळ लागू आहे, तसेच ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत सापडला तेथे एक नाला असून त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे, त्यामुळे वाघावर तेथेच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केला असावा आणि वाघ नाल्यात येऊन मरण पावला असावा, असा तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
मृत्यूनंतर वाघ नाल्यात सुमारे पाच ते सात दिवस पडून होता. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा वनरक्षकांना सात दिवसानंतर वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांनी वनरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, परंतु त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थंडबस्त्यात गेले. विशेष म्हणजे, अडीच वर्षांच्या वाघाचा नैसर्गिक किंवा दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू होऊच शकत नाही, असे वन्यजीव अभ्यासक व तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका वन्यजीवप्रेमीने दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी वाघावर विषप्रयोग केल्यासारखे दिसून येत होते. कारण, वाघाच्या पोटाखालचा भाग पूर्णत: काळा पडलेला होता, तसेच त्याच्या शरीरावर एकही जखम झालेली नव्हती आणि अडीच वर्षांच्या वाघाचा झुंजीत मृत्यू होऊच शकत नाही, असेही त्याने सांगितले. केवळ वन्यजीवप्रेमीच नाही, तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्येही डोनीचा वाघ विषप्रयोगाचा बळी असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. त्यामुळे या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शोधून काढणे महत्वाचे झाले आहे.
हैदराबादच्या अहवालाकडे लक्ष
यासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे म्हणाले, आताच यासंदर्भात काहीच बोलता येणार नाही. असे लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. वाघाचे अवयव आणि विष्ठा हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेली आहे. तेथील प्रयोगशाळेचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच यासंदर्भात अधिकृत वक्तव्य करता येईल, असे ते म्हणाले. त्यामुळे या अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.