ताडोबा, मेळघाट, पेंच, नागझिरा, बोर व उमरेड या व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यातील वाघ, वाघीण व छावे इकडून तिकडे भ्रमण, स्थलांतरण करीत असल्याची बाब वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्ट व चंद्रपूर वन विभागाने केलेल्या संयुक्त कॅमेरा ट्रॅपिंगमधून समोर आली आहे. नागझिरातील प्रिन्स नावाचा वाघ पेंच प्रकल्पात गेल्याची नोंद तसेच मेळघाटचा वाघ बोरमार्गे ताडोबापर्यंत आल्याची नोंद आहे.
वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्ट व चंद्रपूर वन विभागाने केलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमधून वाघ, वाघीण, छावे व बिबटय़ासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आलेल्या आहेत. त्यातीलच एक अभ्यासपूर्ण नोंद म्हणजे विदर्भातील मेळघाट, पेंच, ताडोबा या व्याघ्र प्रकल्पातील वाघ सातत्याने भ्रमण करीत असल्याची नोंद या समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नागझिरा अभयारण्यातील प्रिन्स नावाचा वाघ हा पेंच व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला होता. यासंदर्भातील सर्व छायाचित्रे व व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध असल्याची महिती वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया यांनी दिली. वाघ, वाघिण व छाव्यांची ही भ्रमंती हे सर्व प्रकल्प एकमेकांना जोडून असल्यामुळे साध्य होत असल्याचेही डॉ. अंधेरिया म्हणाले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ हा बोर मार्गे ताडोबात आल्याची नोंद घेण्यात आली आहे. बहुतांश वेळा आईपासून दुरावलेले छावे अशा पध्दतीने कायम भ्रमंतीवर राहात आहेत. विशेषत: वाघाच्या विष्ठेवरून केलेल्या चाचणीतही या बाबी अधिक स्पष्टपणे समोर आल्या आहेत. ताडोबाचा वाघ उमरेडच्या जंगलात गेल्याचीही नोंद आहे. कन्हाळगावच्या प्रस्तावित अभयारण्यातील एक वाघ लगतच्या तेलंगाना राज्यात गेल्याचीही नोंद आहे. याचाच अर्थ एका व्याघ्र प्रकल्पातून दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पात किंवा अभयारण्यात वाघ हा कायम स्थलांतरित होत असतो, असेही डॉ. अंधेरिया म्हणाले.
वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्ट ही संस्था देशातील १८ राज्यांतील ४५ व्याघ्र प्रकल्प व ११० अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपिंगचे काम करीत आहे. तिथेही वाघासंदर्भातील अशा नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विशेषत: नागपूर येथे बावनधरी, पोहरा, महेंद्री, उमरेड या भागात संस्था काम करीत असताना तिथे वाघ हा नेहमीच भ्रमंतीवर राहत असल्याची नोंद घेतलेली आहे. एकूणच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघाच्या भ्रमंतीच्या संदर्भात घेण्यात आलेल्या नोंदी वाघाच्या एकूणच स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.